समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्रे प्रसारित केल्याच्या निषेधार्थ हिंदूत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला हिंसक वळण लागले. जमावाने शहरातील अनेक भागांत केलेल्या दगडफेकीत वाहने, दुकानांचे नुकसान झाले. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार करीत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आता परिस्थिती नियंत्रणात आली असून रहदारी सुरू झाली आहे. परंतु, रस्त्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवराज्याभिषेक दिनी कोल्हापुरात काही तरुणांनी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्रे प्रसारित केली होती. याबाबतची माहिती काही वेळेतच शहरात सर्वत्र पसरली आणि तणावाची स्थिती निर्माण झाली. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारीच हजारोंच्या संख्येने तरुणांनी एकत्र येऊन संबंधितांवर कारवाईची मागणी करीत आंदोलन सुरू केले होते. मंगळवारी शहरात अनेक ठिकाणी घरे, दुकानांवर दगडफेकीच्या घटनाही घडल्या होत्या. संबंधित तरुणांना अटक करावी, या मागणीसाठी हिंदूत्ववादी संघटनांनी बुधवारी ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिली होती. त्यास कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच शहरातील सर्व दुकाने पूर्णत: बंद होती. व्यापारी पेठांमध्ये शुकशुकाट होता. शहरालगतच जिल्ह्याच्या विविध भागांतही आंदोलने करण्यात आली.

हेही वाचा >> “औरंगजेबाच्या अवलादी…”, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचं टीकास्र, म्हणाले, “तथातकथित हिंदुत्त्वाचं…”

बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हिंदूत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते शिवाजी महाराज चौकात जमा झाले. त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. तासाभरात ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. या वेळी जमावाकडून संबंधित गटावर तातडीने कारवाईची मागणी होऊ लागली. तशा घोषणाही सुरू झाल्या. त्यातून पोलीस आणि जमाव यांच्यात संघर्ष झाला. संतप्त जमावाने दगडफेक सुरू केल्याने पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सुरुवातीला लाठीमार केला. या वेळी गटागटाने विखुरलेला जमाव शहराच्या विविध भागांत घुसला.या संतप्त जमावाने वाहने, दुकानांची तोडफोड केली. अनेक घरांवरही दगडफेक केली. अखेर हा जमाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. त्यानंतर काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आली. बुधवारी सायंकाळपर्यंत शहरात तणावपूर्ण शांतता होती. रस्त्यांवर दगड, चपला आणि काचांचा खच पडलेला होता. अनेक मोडलेली, उलटवलेली वाहने रस्त्यावर पडलेली होती.

आज, गुरुवारी (८ जून) सकाळपासून पोलिसांचा बंदोबस्त चौका चाकौत आहे. या बंदोबस्तात नागरिकांचं जनजीवन सुरळीत झालं आहे. वाहतूक पूर्वपदावर आली असून दुकाने सुरू करण्यात आली आहेत. बाजारपेठाही हळूहळू खुल्या होत आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video what is the current situation in kolhapur after violence traffic is moving but sgk
First published on: 08-06-2023 at 11:10 IST