‘मतदार राजा जागा हो, प्रगतीचा धागा हो’, ‘लोकशाही बळकटीकरणासाठी सर्वाचा सहभाग’, ‘एकच लक्ष मताचा हक्क’ अशा विविध घोषणा देत सोमवारी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर महानगरपालिका व तहसीलदार कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने शहरातून मतदार जनजागृती रॅली मोठय़ा उत्साहात काढली
प्रारंभी बिंदू चौकामध्ये नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी पथनाटय़ सादर केले. बिंदू चौक येथून राष्ट्रीय मतदार दिन रॅलीची सुरुवात होऊन ही रॅली शिवाजी पुतळा, महानगरपालिका, सी.पी.आर. या मार्गावरून दसरा चौक येथे नेण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांनी सर्वाना मतदानाविषयी प्रतिज्ञा देऊन मतदानाविषयी जास्तीत जागृती करणेविषयी आवाहन केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त १८ वर्षांवरील मतदारांमध्ये मतदानाच्या जागृतीसाठी एन.सी.सी. विद्यार्थी, विद्यार्थिनींची प्रभातफेरी बिंदू चौक-शिवाजी पुतळा-महानगरपालिका-दसरा चौक या मार्गावरून परत शाहू स्मारक भवन येथे आली. रॅलीची सुरुवात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी झेंडा दाखवून करण्यात आली.
आपल्याला मिळालेले मतदान ओळखपत्र म्हणजे या देशाचे आपण नागरिक असल्याचा तो सन्मान आहे. लोकशाहीच्या प्रगल्भतेसाठी मतदान आवश्यक असून, लोकशाही अधिकाधिक विकसित व्हावी, यासाठी मतदानाचा मूलभूत हक्क नागरिकांनी बजावायलाच हवा, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या वतीने राजर्षी शाहू स्मारक भवन येथे राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लोकशाहीच्या प्रगल्भतेसाठी मतदान करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत डॉ. सुभाष देसाई म्हणाले, भारत बलशाली बनवायचा असेल, तर तरुणांनी निकोप आणि निधर्मी वृत्तीने मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. लोकप्रतिनिधी निवडण्याची ताकद लोकशाहीने मतदारांच्या हाती दिलेली आहे. त्यामुळे मतदारानी जबाबदारीने मतदानाचा हक्क पार पाडावा.
या प्रसंगी राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त १८ वष्रे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मतदान ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. मतदानाचा हक्क बजावण्याबाबत उपस्थितांनी शपथ घेतली. निवडणूक उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले यांनी मनोगत व्यक्त केली. आभार उप विभागीय अधिकारी प्रशांत पाटील यांनी मानले.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2016 रोजी प्रकाशित
कोल्हापुरात मतदार जनजागृती फेरी
पथनाटय़, मतदानाविषयी प्रतिज्ञा, ओळखपत्रांचे वाटप
Written by लोकसत्ता टीम

First published on: 29-01-2016 at 03:15 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voter awareness campaign in kolhapur