|| दयानंद लिपारे

धोका नसल्याचे पाटबंधारे विभागाचे स्पष्टीकरण

कोल्हापूर जिल्ह्यतील सर्वात मोठे काळम्मावाडी धरण, कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारा पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधारा, चिकोत्रा धरणाचे सव्‍‌र्हिस गेट, फहे लघु बंधारा या सिंचन प्रकल्पांना गळती असल्याचे पुढे आले आहे. कोकणातील तिवरे धरण फुटीच्या पाश्र्वभूमीवर या गळतीबाबतही तक्रारी सुरू झाल्या आहेत. मात्र पाटबंधारे विभाग आणि कोल्हापूर महापालिका यांनी ही गळती मान्य करतानाच मात्र त्यामुळे कुठलाही धोका नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यतील तिवरे धरण फुटल्याने अनेकांना प्राण गमवावा लागला. त्यावरून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. धरण, बंधारे आणि पूल यांच्या बांधकामाचा दर्जा आणि जीर्णतेवरून प्रश्न उपस्थित केले जाऊ  लागले आहेत. पाण्याचे कोठार असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यत अशी दुर्घटना होणार नाही याबाबतही आता हालचाली सुरू झाल्या आहेत. यातूनच जिल्ह्यतील काही सिंचन प्रकल्पांना असलेली गळती पुढे आली आहे.

काळम्मावाडी धरणाला गळती

कोल्हापूर जिल्ह्यतील सर्वात मोठे धरण म्हणून काळम्मावाडी धरण ओळखले जाते. ते जुने झाल्याने त्याच्या भिंतींना गळती लागली आहे. गळती काढण्याचे प्रयत्न गेल्या दहा वर्षांंपासून सुरु आहेत. वारंवार मागणी करूनही हे काम पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. धरणाला लागलेल्या गळतीमुळे बांधकाम कमकुवत होऊ न कालांतराने ते ढासळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. १३५० मीटर लांबी असलेल्या धरणातील ४९० मीटरपर्यंतचे बांधकाम दगडी आहे.  दोन्ही बाजूला मातीचे बांधकाम आहे. या ४९० मीटरच्या दगडी बांधकामावर ‘सिमेंट ग्राऊं टिंग’ केले जात आहे.

कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्रीपती गुरव यांनी ही गळती असल्याचे मान्य करत ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले, की या धरणाची गळती ३९८ लिटर प्रति सेकंद होती. गतवर्षी केलेल्या पाहणीमध्ये याचे प्रमाण ८८ लिटर प्रति सेकंद असल्याचा नाशिक येथील धरण  तपासणी यंत्रणेने अहवाल दिला आहे. हे प्रमाण ७७ लिटर प्रति सेकंद इतके कमी होणे गरजेचे असून कामाची गती पाहता ते लवकरच पूर्ण होईल. पावसाळापूर्व आणि नंतर केलेल्या पाहणीत कोणतेही धरण धोकादायक स्थितीत नसल्याचे नाशिक येथील धरण तपासणी यंत्रणेने दिलेल्या अहवालात नमूद केले आहे,असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर पालिकेची टोलवाटोलवी

शिंगणापूर बंधाऱ्याला  दोन वर्षांपासून गळती लागूनही ती थांबवण्याचे प्रयत्न धीम्या गतीने सुरू आहेत. दर महिन्याला पाऊ ण टी.एम.सी. पाणी या बंधाऱ्यातून वाहून जाते असा अंदाज आहे. जलसंपदा विभाग याबाबत कोल्हापूर महापालिकेकडे बोट दाखवत आहे. बंधारा महापालिकेचा असल्याने त्याची देखभाल, दुरुस्ती ही त्यांचीच जबाबदारी असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांचे म्हणणे आहे. महापालिकेचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना याची कल्पना आहे. ‘बंधारा गळती दुरुस्तीचे अंदाजपत्रक केले आहे. पण निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. मक्तेदारांना याकामी तयार करून काम पूर्ण केले जाईल’, असे त्यांनी सांगितले.

नागरिक जबाबदार!

कोल्हापूर दक्षिण विभागातील फहे बंधारा आणि काही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना गळती आहे. ‘याविषयीची निविदा आणि कामाची प्रक्रिया सुरु आहे,’ असे कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी सांगितले. चिकोत्रा धरणाच्या ‘सव्‍‌र्हिस गेट’ला गळती सुरू होती. मात्र आता ती आटोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी बंधाऱ्याशेजारी राहणारे लोक, शेतकरी बंधाऱ्याचे दरवाजे काही प्रमाणात उघडे राहावे आणि त्यातून पाणी मिळावे यासाठी दगड, माती टाकत असतात. त्यातून गळती होत राहते, असे निरीक्षण काही अधिकाऱ्यांनी नोंदवत लोकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली.