कोल्हापुर : कोल्हापूर महापालिकेच्या दळभद्री कारभारामुळे आजही शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. कोल्हापूरकरांचा गणेशोत्सव कोरडा राहिला असून सणासुदीला त्यांच्यावर पोलीस बंदोबस्तातील टँकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे. महापालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा तोकडी असल्याने पुण्याहून यंत्रसामग्री मागवण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठ्याच्या या निष्क्रिय कारभारावर नागरिकांत संताप होऊ लागल्यावर आता अधिकारी रस्त्यावर उतरून पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात दिसू लागले आहेत.
कोल्हापूर शहराला या आठवड्यात पाणीटंचाईचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे गणेश उत्सवाची तयारी सुरू असताना त्यासाठी स्वच्छते करिता पाण्याची गरज अधिक असते. परंतु गेल्या रविवारी काळम्मावाडी धरणातील पाणीपुरवठ्यात तांत्रिक दोष झाल्यामुळे पाणीपुरवठा होऊ शकला नाही. शहराच्या काही भागाला तर पाच दिवस पाणी पुरवठा होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
काळम्मावाडी येथील पंपातील व्हीएफडी कार्ड खराब झाल्याने शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मंगळवारी रात्री पाणीपुरवठा सुरळीत होईल असे काल रात्री महापालिकेकडून सांगण्यात आले होते. परंतु हेही आश्वासन आता फोल ठरले आहे. आज तिसऱ्या चाचणीवेळी आलेला दोष काढून टाकल्यानंतर बुधवारी पहाटे चौथ्या चाचणी दरम्यान पुन्हा दोष उधभवल्याने नियोजित पाणीपुरवठा ठप्प झाला.
पुणे महापालिकेवर भिस्त
अशातच महापालिकेकडे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा नसल्याचे उघडकीस आले आहे. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी आज पुणे महापालिका प्रशासक नवल किशोर राम यांच्याशी संपर्क साधला. कंपनीकडून आवश्यक भाग उपलब्ध न झाल्याने पुणे महापालिकेकडून संपूर्ण क्रोबार असेंबली संच देण्यात आला आहे. याशिवाय , पुणे महापालिकेचा तज्ञ तंत्रज्ञ सुधा6 कोल्हापुरात दाखल होत आहेत. ही असेंबली सायंकाळपर्यंत महापालिकेकडे येणार आहे. रात्री काळम्मावाडी येथे जोडणीचे काम पूर्ण करून तपासणी होईल. त्यानंतर पहाटेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न होणार आहे. व्हीएफडी कार्ड दुरुस्तीचे कामकाज उपायुक्त कपिल जगताप व जल अभियंता हर्षजित घाटगे हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून पाहत आहेत.
टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची व्यवस्था
शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन महापालिकेच्या तसेच खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. वाढत्या मागणीनुसार बाहेरून अतिरिक्त टँकरही मागवण्यात आले आहेत. विविध वॉर्डसाठी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून संपर्कासाठी त्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
अधिकारी बावडा जलशुद्धीकरण केंद्रात उपस्थित राहून टँकर व्यवस्थापन पाहत आहेत. पोलीस बंदोबस्तासह टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. इतर अधिकारी-कर्मचारीही यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
टँकर पुरवठ्यात गोंधळ
कोल्हापूर शहराला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग असमर्थ ठरला आहे. त्यामुळे टँकरद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. तथापि काही भागात मुबलक प्रमाणात टँकर दिसत आहेत. त्यामुळे तेथील लोकांना काही प्रमाणात पाणी मिळत आहे. परंतु इतर भागांमध्ये अपुऱ्या प्रमाणात टँकर पोहोचत आहे. तेथील लोकांना पाण्यासाठी आणि गणेश उत्सवात वणवण भटकण्याची वेळ आली आहे.