वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची यात्रा यंदा भक्तांविना पार पडली. करोना विषाणूच्या फैलावामुळे यंदा हा उत्सव रद्द करण्यात आला होता. रोगराईमुळे यात्रा रद्द करण्याचा हा इतिहासातील दुसरा प्रसंग आहे. दरम्यान यात्रेसाठी भाविकांच्या येण्यावर बंदी घातली असल्याने एरवी चैत्र पौर्णिमेला गर्दीने फुलून जाणारा मंदिर परिसर मंगळवारी मात्र सुनासुना झाला होता. यात्रेच्या या मुख्य दिवशी श्री जोतिबाची दरबारी अलंकारिक महापूजा बांधण्यात आली.
जोतिबाची चैत्र पौर्णिमेची ही यात्रा भारतातील एक महत्वाची म्हणून गणली जाते. या यात्रेस महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्रप्रदेशसह अन्य काही राज्यातील लाखो भाविक येत असतात. यंदा करोनाच्या साथीमुळे ही यात्रा रद्द करण्यात आली. आज यात्रा रद्द झाली तरी मोजक्या पुजाऱ्यांकडून महापूजा करण्यात आली. यावेळी जोतिबा देवांची दरबारी अलंकारिक महापूजा बांधण्यात आली. एरवी यात्रेदिवशी होणारे मानाच्या सासनकाठीचे पूजन, गुलाल-खोबऱ्याची उधळण, जोतिबा-यमाई देवी भेटीचा सोहळा, श्रींची पालखी, आरती, धूपारती आदी कसलेही विधी आज झाले नाहीत. पालखी काढण्याची मागणी पुजाऱ्यांनी केली होती; मात्र ती नाकारण्यात आली. जोतिबा यात्रेसाठी गावागावातून गुलालाची उधळण करत आणि ‘जोतिबाच्या नावाने चांगभलं’ असा जयघोष करीत उंच जरीपटका आकाशामध्ये फडकत मिरवणाऱ्या मानाच्या सासनकाठय़ा डोंगरावर आज प्रथमच दिसल्या नाहीत.
जोतिबाचा डोंगर निर्मनुष्य
मंदिरात पुजारी दरवर्षीप्रमाणे विधिवत पूजाअर्चा पूजा केली. बाहेरगावचे तर राहोच डोंगरावरील कोणीही भाविक मंदिरात आले नाहीत. बंदोबस्तावरील पोलीस यंत्रणा वगळता जोतिबाचा डोंगर पूर्णत: निर्मनुष्य होता. लोक न आल्याने नेहमी होणारा पोलीस यंत्रणेवरील ताण या वेळी प्रथमच जाणवला नाही. कोल्हापुरातील पंचगंगा नदीवर स्नानासाठी झुंबड उडालेली असायची, पण आज पंचगंगा काठ भाविकांअभावी सुनासुना दिसत होता.
दुसऱ्यांदा यात्रा रद्द
सन १८९९ साली प्रथमच जोतिबाची चैत्र यात्रा रद्द करण्यात आली होती. तेव्हा प्लेगची साथ असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून यात्रा रद्दचा आदेश दिला होता. पुढील वर्षी यात्रा भरवण्याचा आदेश राजर्षी शाहू महाराज यांनी दिला होता. त्यानंतर इतक्या वर्षांनंतर करोना साथीमुळे प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून चैत्र यात्रा रद्द झाली आहे. दोन्ही वेळा यात्रा रद्द होण्यास रोगराई हेच कारण ठरले.