भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेच्या (फिफा) दोन प्रमुख अधिकाऱ्यांना झुरिच येथून गुरुवारी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणात आणखी १६ अधिकारी सहभागी असल्याचे आरोपपत्र अमेरिकेने दाखल केले आहे. यामध्ये फिफा कार्यकारिणीच्या पाच आजी-माजी सदस्यांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे.
स्वित्र्झलड अधिकाऱ्यांनी गुरुवारी केलेल्या कारवाईत पेराग्वेचे जुआन अँगल नॅपोट आणि होंडुरासचे अल्फ्रेडो हॅवीट अशी या दोन अधिकाऱ्यांना अटक झाली होती. ‘‘भ्रष्टाचाराचे प्रमाण गैरवाजवी आहे,’’ असे अमेरिकेचे अ‍ॅटर्नी जनरल लारेट्टा लिंच यांनी सांगितले. अमेरिकेने दाखल केलेल्या आरोपपत्रात होंडुरासचे माजी अध्यक्ष (१९९०-९४) आणि फिफाच्या दूरवाहिनी व विपणन समितीचे सदस्य राफेल कॉलेजास यांचा समावेश आहे. तसेच ग्वाटमाला फुटबॉल असोसिएशनचे सरचिटणीस हेक्टर त्रुजिलो यांच्यावरही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
प्लाटिनी प्रकरणावर १६ ते १८ डिसेंबरला चर्चा
लुसाने : मायकेल प्लाटिनी यांच्यावरील आरोपांवर १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत फिफाच्या आचारसंहिता समितीची बैठक बोलावण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. युरोपियन फुटबॉल असोसिएशनचे प्रमुख प्लाटिनी यांना फिफाचे माजी अध्यक्ष सेप ब्लाटर यांच्याकडून गैरमार्गाने दोन लाख अमेरिकन डॉलर घेतल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.