*माद्रिदचा माल्मोवर ८-० असा दणदणीत विजय
*मँचेस्टर युनायटेडला पराभवाचा धक्का

सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली. रोनाल्डोने स्वत:चाच विक्रम मोडीत काढत फक्त १९ मिनिटांमध्ये ‘गोलचौकार’ लगावण्याची किमया साधली. चॅम्पियन्स फुटबॉल लीगमध्ये या चार गोलच्या जोरावर रिअल माद्रिदने माल्मो संघावर ८-० असा दणदणीत विजय मिळवला. दुसरीकडे वूल्फस्बर्गने मँचेस्टर युनायटेडसारख्या बलाढय़ संघावर ३-२ असा विजय मिळवत साऱ्यांनाच धक्का दिला.
माद्रिदच्या बेंझेमाने १२ आणि २४व्या मिनिटाला दोन गोल करीत संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण त्यानंतर रोनाल्डोचा ‘गोलआविष्कार’ पाहायला मिळाला. ३९ ते ५८ या १९ मिनिटांमध्ये चार गोल मारत रोनाल्डोने चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. चपळता, वेग आणि चाणाक्षपणा असा तिहेरी संगम या वेळी रोनाल्डोच्या खेळातून पाहायला मिळाला. या चार गोलसह या मोसमात त्याचे एकूण ११ गोल झाले आहेत. रोनाल्डोच्या चार गोलनंतर बेंझेमाने ७४व्या मिनिटाला गोल करीत पाच वर्षांमध्ये पहिल्यांदा हॅट्ट्रिक साजरी केली. माद्रिदच्या या विजयात मातेओ कोव्हाकिकनेही एक गोल केला.
युनायटेडला दहाव्या मिनिटालाच अँथोनी मार्टियलने संघाला खाते उघडून दिले, पण त्यानंतर वूल्फस्बर्गच्या नाल्डोने गोल करत संघाला १-१ अशी बरोबरी करून दिली. त्यानंतर २९ व्या मिनिटाला व्हिइरिन्हाने गोल करीत वूल्फस्बर्ग संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या ८२व्या मिनिटाला वूल्फस्बर्गच्या गुइलाव्होगुईकडून स्वयंगोल झाला. पण या वेळी वूल्फस्बर्गसाठी नाल्डो धावून आला. त्याने त्यानंतर दोन मिनिटांनीच नेत्रदीपक गोल करीत संघाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली.