06 March 2021

News Flash

..हे पाच विक्रम भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत मोडीत निघू शकतात

अजिंक्य रहाणे कसोटी कारकीर्दीतील दोन हजार धावांचा टप्पा या मालिकेत गाठेल

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका येत्या २२ सप्टेंबरपासून सुरू होणार असून या तीन सामन्यांच्या मालिकेत अनेक विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे. अजिंक्य रहाणे कसोटी कारकीर्दीतील दोन हजार धावांचा टप्पा या मालिकेत गाठेल, तर टीम साऊदी याच्याकडे २०० विकेट्सचा आकडा गाठण्याची संधी आहे. याशिवाय आणखी पाच मोठे आणि महत्त्वाचे विक्रम या कसोटी मालिकेत मोडीत निघू शकतात.

न्यूझीलंडवर मोठ्या फरकाने जिंकण्याची विराटला संधी-
विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने परदेशात दोन कसोटी मालिका जिंकल्या आहेत, तर मायदेशात कसोटी मालिकेबाबत भारतीय संघाचा कामगिरी चांगली राहिली आहे. भारतात खेळविल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकूण १० कसोटी मालिकांमध्ये भारताने ८ मालिका खिशात घातल्या आहेत. पण यामध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध २-० अशा सर्वाधिक फरकाने मालिका जिंकली आहे. यावेळी विराट कोहलीच्या संघाला न्यूझीलंडविरुद्धचे तिनही सामने जिंकून ३-० अशा मोठ्या फरकाने मालिका खिशात घालण्याची संधी आहे.

न्यूझीलंड फलंदाजाकडून कसोटी कारकीर्दीत सर्वाधिक शतकांचा विक्रम-
न्यूझीलंडकडून खेळताना कसोटी कारकीर्दीत सर्वाधिक शतकांचा विक्रम माजी फलंदाज मार्टिन क्रो यांच्या नावावर आहे. मार्टिन क्रो यांनी आपल्या १३ वर्षांचा कारकीर्दीत ७७ कसोटी सामन्यांमध्ये एकूण १७ शतके ठोकली होती. मार्टिन क्रो यांचा विक्रम मोडण्याची संधी न्यूझीलंडचे फलंदाज रॉस टेलर आणि कर्णधार केन विल्यमसन यांना आहे. रॉस टेलरच्या खात्यात १५ कसोटी शतके जमा आहेत, तर केन विल्यमसन हा केवळ एका शतकाने मागे आहे.

भारतीय मातीत ऐतिहासिक विजय प्राप्त करण्याची न्यूझीलंडला संधी-
न्यूझीलंडच्या संघाला आजवर भारतात एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. १९५५ साली पहिल्यांदा न्यूझीलंडचा संघ कसोटी मालिकेसाठी भारत दौऱयावर आला होता. तेव्हापासून आजवर न्यूझीलंड एकूण १० वेळा भारत दौरे केले. पण एकाही दौऱयात न्यूझीलंडला कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. यंदा न्यूझीलंड चांगल्या फॉर्मात असून, नुकतेच संघाने झिम्बाब्वेविरुद्ध २-० ने मालिका जिंकली होती. त्यामुळे इतिहास बदलण्याची संधी न्यूझीलंडकडे आहे.

जलद गतीने दोनशे विकेट्स घेणारा आशियातील पहिला गोलंदाज होण्याची अश्विनला संधी-
कमीत कमी सामन्यांत २०० विकेट्स घेण्यारा आशियातील गोलंदाज म्हणून पाकिस्तानचे माजी गोलंदाज वकार युनीस यांच्या नावाची नोंद आहे. वकार यांचा हा विक्रम मोडीत काढण्याची संधी भारताचा फिरकीपटू आर.अश्विन याच्याकडे आहे. जलद गतीने २०० विकेट्स मिळविण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम हा ऑस्ट्रेलियाचे फिरकीपटू ग्रिमेट यांच्या नावावर आहे. त्यांनी ३६ सामन्यांमध्ये दोनशे विकेट्स टप्पा गाठला होता. अश्विननच्या खात्यात सध्या ३६ सामन्यांमध्ये १९३ विकेट्स जमा आहेत, तर वकार युनीस यांनी ३८ सामन्यांमध्ये दोनशे विकेट्सचा टप्पा ओलांडला होता. वकार यांचा विक्रम मोडीत काढून जलद गतीने दोनशे विकेट्स मिळवणारा आशियातील गोलंदाज म्हणून नाव नोंदविण्याची अश्विनला संधी आहे.

पदार्पणात सलग कसोटी मालिका जिंकण्याचा भारतीय कर्णधाराचा विक्रम-
कसोटी कर्णधार म्हणून आपल्या पदार्पणातच सलग कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम मोडीत काढण्याची संधी विराट कोहलीला आहे. माजी कर्णधार अजित वाडेकर, सौरव गांगुली , एम.एस.धोनी आणि विराट कोहली यांनी संघाचा कर्णधार म्हणून आपल्या पदार्पणात लागोपाठ तीन कसोटी मालिका जिंकल्या होत्या. आता विराट कोहलीकडे हा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.
कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने श्रीलंका, द.आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका खिशात टाकली आहे. आता न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकून विराट नवा विक्रम प्रस्थापित करण्याचा तयारीत असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 5:43 pm

Web Title: 5 records that can be broken in the india new zealand test series
Next Stories
1 Rio Olympics: कमी खर्च झालेल्या खेळाडूंनाच यश!
2 संदीप पाटील म्हणतात रोहित शर्माला कसोटीमध्ये पुरेशी संधी मिळालीच नाही
3 भारतीय संघाच्या निवडीवर काय म्हणाले ट्विटरकर..
Just Now!
X