कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवल्या गेलल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेने झुंजार खेळ करत भारताला ४ गड्यांनी मात दिली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेसमोर १३३ धावांचे आव्हान ठेवले. पण या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची दयनीय अवस्था झाली. शंभर धावांच्या आत लंकेने पाच गडी गमावले. भारताचा फिरकीपटू राहुल चहरने लंकेच्या वनिंदू हसरंगाला बाद करत लंकेचे कंबरडे मोडले. मात्र बाद होऊनही हसरंगाने चहरचे कौतुक करत खेळभावना दाखवून दिली.

राहुल चहरने टाकलेल्या १५व्या षटकात हसरंगा बाद झाला. चहरने हसरंगाला यष्टीच्या बाहेरचा चेंडू खेळवला. हसरंगाने मारलेला चेंडू पॉईंटला उभ्या असलेल्या भुवनेश्वर कुमारने टिपला. हसरंगाला बाद केल्यानंतर चहरने त्याच्याकडे पाहत आक्रमक निरोप दिला. हसरंगानेही कोणतेही प्रत्युत्तर न देता चहरचे कौतुक केले. हसरंगाला १५ धावा करता आल्या.

 

हेही वाचा – ‘‘…तर एका वर्षात बुमराह संपून जाईल”, शोएब अख्तरनं दिला टीम इंडियाला इशारा

श्रीलंकेने या विजयासह टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी राखली. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेची सुरुवात खराब झाली. पण धनंजय डि सिल्वाने केलेल्या चिवट खेळीमुळे श्रीलंकेला हा विजय साकारता आला. डि सिल्वाला सामनावीर पुरस्कार मिळाला.

असा रंगला सामना

या सामन्यात लंकेचा कर्णधार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकत प्रथम भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. अकिला धनंजया आणि वनिंदू हसरंगा या फिरकीपटूंनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे श्रीलंकेने भारताला २० षटकात ५ बाद १३२ धावांत रोखले. प्रत्युत्तरात श्रीलंकेने २ चेंडू राखत हे आव्हान पूर्ण केले. करोनाची बाधा झालेल्या कृणाल पंड्याच्या संपर्कात आल्यामुळे भारताचे अनुभवी क्रिकेटपटू टी-२० मालिकेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, नितीश राणा आणि चेतन साकारिया यांना आज टी-२० पदार्पणाची संधी मिळाली.