टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीबाबत नेहमी चर्चा होत असते. त्याची गोलंदाजी करण्याची पद्धत इतर गोलंदाजांपेक्षा वेगळी आहे. सुरुवातीच्या टप्प्यात बुमराह जास्त काळ गोलंदाजी करू शकणार नाही, असे भाकीत अनेकांनी वर्तवले होते. पण त्याने आपल्या गोलंदाजीत विविध पैलू आणत सर्वांना थक्क केले. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएभ अख्तरने बुमराहबाबत भारताला इशारा दिला आहे. प्रत्येक सामन्यात बुमराहला न खेळवता, त्याच्यावर येणाऱ्या ताणाचे व्यवस्थापन भारताने केले पाहिजे, असे अख्तरने सांगितले आहे.

बुमराह आता पाच वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. २०१९च्या उत्तरार्धात पाठीच्या दुखापतीनंतर त्याच्या फॉर्ममध्ये घट दिसून आली आहे. क्रिकेटच्या मैदानात परतल्यानंतर तोपूर्वीसारखा प्रभावी दिसत नव्हता. त्याचा इकॉनॉमी रेटही वाढला आणि बळी घेण्याची क्षमताही कमी झाली.

काय म्हणाला अख्तर?

अख्तर स्पोर्ट्स तकशी बोलताना म्हणाला, ”बुमराह फ्रंटल अॅक्शनने गोलंदाजी करतो. यात गोलंदाज पाठीचा आणि खांद्याचा अधिक वापर करतात. आम्ही साइड-ऑन गोलंदाजी करायचो. यामुळे, आपल्या पाठीला आणि खांद्यांना तितका ताण आला नाही. आपल्याला फ्रंटल अॅक्शनसह कोणत्याही सवलती मिळणार नाहीत. जर तुम्हाला तुमच्या पाठीवर आणि कंबरेला दुखापत झाली असेल, तर तुम्ही काहीही करण्यास सक्षम राहणार नाही. या अॅक्शनमुळे वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज इयान बिशप आणि शेन बाँडची प्रकृती खालावत असल्याचे मी पाहिले आहे.”

हेही वाचा – शोएब अख्तरनं अनुष्काला केलं होतं सावध, विराटबाबत सांगितली होती ‘ही’ गोष्ट

”जर तुम्ही प्रत्येक सामन्यात बुमराहला घेतले, तर तो एका वर्षात संपून जाईल. कोणत्याही मालिकेतील पाचपैकी तीन सामन्यात त्याला मैदानात उतरवा. जर बुमराहला वर्षानुवर्षे भारतासाठी खेळायचे असेल, तर त्याने ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे”, असेही अख्तरने सांगितले.

बुमराहने दोन वर्षांत खेळलेत २७ आंतरराष्ट्रीय सामने

बुमराह सध्या टीम इंडियासह इंग्लंडच्या दौर्‍यावर आहे. त्याने २०१६मध्ये एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने २०१८मध्ये आपली पहिली कसोटी खेळली होती. गेल्या पाच वर्षांत बुमराहने भारताकडून २० कसोटी, ६७ एकदिवसीय आणि ५० टी-२० सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यात १०८, कसोटीत ८३ बळी आणि टी-२० मध्ये त्याने ५९ बळी घेतले आहेत.

गेल्या दोन वर्षांत बुमराहने २७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात १० कसोटी, ९ एकदिवसीय आणि ८ टी-२० सामन्यांचा समावेश आहे. या दरम्यान त्याने कसोटी सामन्यात २५.११च्या सरासरीने ३४ बळी घेतले आहेत.