एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, महेंद्रसिंह धोनी, डेव्हिड वॉर्नर हे क्रिकेटपटू आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात. या क्रिकेटपटूंनी आपल्या दमदार फलंदाजीमुळे अनेक विक्रम रचले आहेत. मात्र, या सर्वांना मागे टाकत अहमद मुसद्दिकने नवा कारनामा केला आहे. ईसीएस टी-१० लीग म्हणजे युरोपियन क्रिकेट सीरिजमध्ये मुसद्दिकने चक्क २८ चेंडूत शतक ठोकत सर्वांना स्तब्ध केले. कुमेरफेल्डर स्पोर्टव्हरिन आणि टीएचसीसी हॅम्बर्ग यांच्यातील सामन्याच्या पहिल्या डावात त्याने हाव पराक्रम केला.

३२ वर्षीय अहमद मुसद्दिकने पहिल्याच चेंडूपासून गोलंदाजांचा खरपूस समाचार घेण्यास सुरुवात केली. त्याने ३३ चेंडूंत ११५ धावा फटकावत आपल्या संघाला दहा षटकांत २ बाद १९८ अशी धावसंख्या उभारून दिली. मुसद्दीकच्या या अविस्मरणीय खेळीत ७ चौकार आणि १३ षटकारांचा समावेश होता. त्याने हॅमबर्गच्या खेळाडूंना मैदानात पळव पळव पळवले.

हेही वाचा – आयपीएल २०२१पूर्वी दोन मुंबईकर क्रिकेटपटूंचा ‘खास’ व्हिडिओ होतोय व्हायरल!

मुसद्दिकने पहिल्याच षटकापासून हाणामारी करत अभिनंदन झाच्या षटकात २६ धावा केल्या. अशा सुरुवातीनंतर मुसद्दिकला कोणीही थांबवू शकले नाही. पाचव्या षटकात अहमद मुसद्दीकने बेहराम अलीला सलग चार षटकार ठोकत केवळ १३ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्यानंतर आणखी १५ चेंडू खेळत त्याने आपले शतक फलकावर लावले.

या खेळीसह तो युरोपियन क्रिकेट मालिकेच्या इतिहासात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला. यापूर्वी इंडियन क्रिकेट क्लबचे सदस्य गोहर मनन यांच्या नावावर हा विक्रम नोंदवण्यात आला होता. त्यांनी क्लुज क्रिकेट क्लब विरुद्ध २९ चेंडूत शतक ठोकले होते.

हेही वाचा – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित झालेल्या खेळाडूसाठी चक्क पंतप्रधानांचा पुढाकार!

कुमेरफेल्डर स्पोर्टव्हरिनच्या विशाल पाठलाग करताना टीएचसीसी हॅमबर्गचे फलंदाज ढेपाळले. त्यांचे केवळ दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. निर्धारित १० षटकांत संघाला ५३  धावा करता आल्या.