आकांक्षा हगवणेने जम्मू येथे सोमवारी झालेल्या राष्ट्रीय सबज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. आकांक्षा, आर. वैशाली व के. प्रियंका यांनी ११ फेऱ्यांमध्ये प्रत्येकी साडेआठ गुणांची कमाई केली. प्रगत गुणांकनानुसार त्यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक देण्यात आले. आकांक्षा व वैशाली यांनी प्रत्येकी आठ डाव जिंकले व एक डाव बरोबरीत सोडविला. त्यांना प्रत्येकी दोन डावांमध्ये हार मानावी लागली. प्रियंका हिने सहा डाव जिंकले व पाच डाव बरोबरीत सोडविले. आकांक्षाला विजेतेपदाबद्दल ३६ मानांकन गुणांचाही लाभ होणार आहे. तिने कुमार गटाची राष्ट्रीय विजेती असलेल्या वैशालीविरुद्धचा डाव बरोबरीत सोडविला. आकांक्षापेक्षा वैशालीचे मानांकन गुण जास्त असल्यामुळे या डावातील बरोबरीचा फायदा आकांक्षाला विजेतेपदासाठी झाला. आकांक्षाने चौथ्या फेरीत घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवली.