जगभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने बॅडमिंटनच्या मे, जून आणि जुलै या कालावधीत होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय, कनिष्ठ आणि अपंगांच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) सोमवारी हा निर्णय घेतला. प्रतिष्ठित इंडोनेशिया खुल्या स्पर्धेलाही त्याचा फटका बसणार आहे.

‘बीडब्ल्यूएफ’च्या वतीने होणाऱ्या जागतिक टूरसह दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या स्पर्धादेखील रद्द  करण्यात आल्या आहेत. जुलैपर्यंत स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय ‘बीडब्ल्यूएफ’ने यजमान सदस्य देशांच्या संघटनांशी चर्चा करून घेतला. या कालावधीत इंडोनेशिया खुली या ‘सुपर १०००’ प्रकाराची स्पर्धाही रद्द के ली जाणार आहे. ‘‘करोनाचा संसर्ग जगभरात वाढत चालला आहे.  या स्थितीत जुलैपर्यंतच्या स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. खेळाडूंची प्रकृती सांभाळणे याला सर्वोच्च प्राधान्य आहे. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीवरील स्थगिती कधी उठवायची, याचा निर्णयही स्पर्धाना सुरुवात झाल्यावर घेऊ,’’ असे ‘बीडब्ल्यूएफ’ने स्पष्ट केले.

टोक्यो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आल्यानंतर आता पात्रता स्पर्धाचे कसे नियोजन करायचे, याचादेखील आढावा घेण्यात येणार असल्याचे ‘बीडब्ल्यूएफ’कडून सांगण्यात आले.