अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीत अवघ्या दोन दिवसांमध्ये विजय मिळवल्यानंतर, इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. यो-यो फिटनेस चाचणीत भारताचा कर्णधार विराट कोहली पास झाल्याचं बीसीसीआयने जाहीर केलं आहे. काल फिटनेस चाचणीदरम्यान विराट कोहलीच्या खांद्याला आणि मानेला दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर बीसीसआयने कोहलीच्या चाचणीचा निकाल राखून ठेवला होता. मात्र अखेर बीसीसीआयने कोहलीला हिरवा कंदील दाखवला आहे.

मात्र भारतीय क्रिकेट संघामागचं यो-यो फिटनेस टेस्टचं ग्रहण काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. कारण संजू सॅमसन, मोहम्मद शमी पाठोपाठ फिटनेस चाचणीत नापास झाल्यामुळे अंबाती रायडूला संघाबाहेर जाव लागणार आहे. आयपीएलच्या अकराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळताना अंबाती रायडूने धावांची बरसात केली होती. या कामगिरीच्या जोरावर रायडूची इंग्लंड दौऱ्यात मर्यादीत षटकांच्या सामन्यासाठी निवड झाली होती. मात्र बीसीसीआयने सर्व खेळाडूंसाठी यो-यो फिटनेस टेस्ट अनिवार्य केल्यानंतर, अंबाती रायडूचं संघात पुनरागमन करण्याचं स्वप्न धुळीस मिळालं आहे.

विराट कोहलीसोबत काल बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, भुवनेश्वर कुमार, केदार जाधव यांची चाचणी घेण्यात आली. या सर्व खेळाडूंनी आपली फिटनेस चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. भारतीय संघाचा इंग्लंड दौरा ३ जुलैपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारत ३ टी-२०, ३ वन-डे आणि ५ कसोटी सामने खेळणार आहे.