जुर्माला (लॅटव्हिया) : माजी फ्रेंच विजेत्या एलिना ओस्टापेंकोला कडवी झुंज देताना पहिल्या एकेरीत सामन्यात अंकिता रैनाने पराभव पत्करला. त्यानंतर कर्मान कौर ठंडीने दुसरा एकेरी सामना गमावल्यामुळे बिली जीन किंग्ज चषक टेनिस स्पर्धेच्या जागतिक टप्प्यातील लढतीच्या पहिल्या दिवशी लॅटव्हियाविरुद्ध भारत ०-२ असा पिछाडीवर पडला आहे.

जागतिक टेनिस क्रमवारीत १७४व्या क्रमांकावर असलेल्या अंकिताने ५२व्या क्रमांकावर असलेल्या ओस्टापेंकोला दोन तास, १६ मिनिटे झुंजवले. हा सामना अंकिताने २-६, ७-५, ५-७ अशा फरकाने गमावला. क्रमवारीत ६२१व्या स्थानावर असलेल्या कर्मानने मात्र क्रमवारीत ४७व्या स्थानावर असलेल्या अ‍ॅनास्टासिजा सेव्हास्टोव्हाविरुद्ध ४-६, ०-६ असा सहज पराभव पत्करला. त्यामुळे शनिवारी भारताला एक दुहेरी आणि दोन परतीचे एकेरी असे तिन्ही सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. लॅटव्हियाविरुद्ध भारताने लढत गमावल्यास भारताची आशिया/ओशियाना गटात पदावनती होईल.