डॉ. प्रकाश परांजपे

चार खेळाडू जमले की ब्रिजचा डाव सुरू करता येतो. उत्तर-दक्षिण विरुद्ध पूर्व-पश्चिम असा हा सामना असतो. समोरासमोरचे खेळाडू एकमेकांचे जोडीदार असतात. एक पत्त्यांचा कॅट लागतो. ब्रिजकरिता कॅटमधले ५२ पत्तेच लागतात. नवीन कॅट असेल तर त्यातल्या पत्त्यांच्या गठ्ठय़ात ५४ किंवा ५५ पाने असतात. या पानांची एक बाजू दर्शनी, सारख्याच चित्राची किंवा कलाकुसरीची असते, तर दुसरी बाजू मुद्दय़ाची. या दुसऱ्या बाजूला पानाचा पंथ व हुद्दा यांची मांडणी असते. इस्पिक, बदाम, चौकट आणि किलवर हे चार पंथ. यातले दोन काळ्या रंगाचे तर दोन लाल.

प्रत्येक पंथात एक्का, राजा, राणी, गुलाम ही चित्र असलेले चार पत्ते आणि २ ते १० असे आकडे असलेले नऊ म्हणजेच एकूण १३ पानं असतात. एक्क्याचा मान सगळ्यात मोठा, त्याखाली क्रमाने राजा, राणी, गुलाम आणि मग १० ते २ असा आकडय़ांचा उतरता मान. पुढील खेळात एखादा हात (दस्त असा फारसी शब्दही काही मराठी लोक याऐवजी वापरतात) कुठली बाजू जिंकणार ते या मानाप्रमाणं ठरतं.

चार पंथांची प्रत्येकी १३ मिळून ५२ आणि एक किंवा दोन जोकर असा हा पानांचा संच असतो. रमी व काही इतर खेळांना जोकर हे पान लागतं, ब्रिजला नाही. काही कॅटमध्ये ब्रिजच्या गुणांचा तक्ता असलेलं एक पान असतं. ही २-३ पानं बाजूला काढून, ५२ पानं घेऊन चारांपैकी एक खेळाडू म्हणजेच वाटप्या ती चार जणांना एकेक करून वाटतो.

ब्रिजचा गाडा घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे चालतो, त्यामुळे वाटप्या पहिलं पान आपल्या डाव्या हाताच्या खेळाडूला, दुसरं समोरच्याला, तिसरं उजव्याला, तर चौथं स्वत:ला अशा क्रमानं एक-एक करून पालथी वाटतो. सगळी ५२ पानं वाटून झाली की प्रत्येक खेळाडू आपापली पानं हातात घेतो. खेळाच्या या टप्प्यात प्रत्येक खेळाडू फक्त आपलीच पानं बघू शकतो.

यानंतर बोलींचं सत्र चालू होतं. बोलींच्या माध्यमातून दोन्ही जोडय़ांना आपापल्या ताकदीचा मागोवा घेत आपली झेप कुठपर्यंत जाईल, याचा अंदाज बांधावा लागतो. जास्त हात करण्याची जबाबदारी घेतली तर जास्त गुण मिळतात. बोलल्याएवढे हात करता आले नाहीत तर फक्त प्रतिपक्षाला गुण  मिळतात. सर्वोच्च बोलीद्वारे हुकमाचा पंथ ठरतो आणि कंत्राट जिंकणाऱ्या जोडीतला एक खेळाडू आपली पानं सगळ्यांना दिसतील अशी टेबलवर पसरून ठेवतो. हात जिंकण्यासाठी पानांचा खेळ चालू होतो..

(आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)

panja@demicoma.com