प्रशांत केणी

त्याची फलंदाजी म्हणजे जणू मुक्तछंदातले काव्य. ती तंत्रशुद्धतेचे सर्व बंध झुगारते. ताजेच उदाहरण द्यायचे झाल्यास पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात जोफ्रा आर्चरच्या १५० किमी प्रति ताशी वेगाच्या चेंडूवर त्याने खेचलेल्या रीव्हर्स स्कूपच्या षटकाराचे देता येईल. तेव्हा आर्चरचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता. भारतीय क्रिकेट यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंह धोनीचा वारसदार शोधत असताना गवसलेला वेगळ्या पठडीतला क्रिकेटपटू म्हणजे ऋषभ पंत.

पंत हा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी देशातील पहिल्या क्रमांकाचा यष्टीरक्षक असेल, असे दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी निर्धास्तपणे म्हटले होते. फलंदाजीत सातत्याचा अभाव, यष्टीरक्षणातील ढिसाळपणा अशा अवस्थेतून पंत त्या वेळी जात असल्याने प्रसाद यांचे हसे झाले. त्रिनिदादला पंत बाद झाल्यानंतर संतप्त प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, ‘‘पंत ज्या पद्धतीने फटका खेळून बाद झाला, त्याची पुुनरावृत्ती केल्यास त्याला सांगावे लागेल की, तुमच्यात गुणवत्ता असो किंवा नसो, तुम्हाला त्याचे परिणाम भोगण्यासाठी तयार राहायला हवे.’’ निर्भयतेने खेळणे आणि निष्काळजीपणे खेळणे, यातील फरक युवा खेळाडूंनी समजून घ्यायला हवा. पंतला निर्भयतेने खेळायला हवे, निष्काळजीपणे नव्हे, असे भारताचे फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी म्हटले होते. पण त्यातून सावरत पंतने आता स्वत:ला सिद्ध केले आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकांमधील यशात पंतचा सिंहाचा वाटा होता. ऑस्ट्रेलियात मातब्बर फलंदाज हाराकिरी पत्करत असताना पंतने तीन सामन्यांत ६८.५०च्या सरासरीने एकूण २७४ धावा काढल्या, तर इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांत ५४च्या सरासरीने एकूण २७० धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान रोहित शर्माने पंतची बाजू घेताना म्हटले की, ‘‘पंतला दडपणविरहित मुक्तपणे खेळायचा परवाना दिला, तर तो सामना जिंकून देणारी कामगिरी करू शकतो. हे त्याने सिद्ध केले आहे. पंत आता सामन्याच्या स्थितीनुसार खेळू लागला आहे.’’

पंत हा उत्तराखंडमधील रूडकीचा. आता यष्टीपाठी पोपटपंची करणारा पंत बालपणी शांत वृत्तीचा होता. पण शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत दिवसभर क्रिकेट सामने खेळत असल्याने घरातून मात्र कानउघाडणी व्हायची. तो १० वर्षांचा असताना दिल्लीत प्रशिक्षक तारक सिन्हा यांच्या गुणवत्ता शोध मोहिमेत सहभागी झाला. आठवड्यातून दोन दिवस होणाऱ्या या सरावासाठी दिल्लीतील निवास परवडत नव्हता. त्यामुळे गुरूद्वारामध्ये लंगर खाऊन तिथेच झोपायचा. मग प्रशिक्षकाच्या सूचनेनुसार १४ आणि १६ वर्षांखालील क्रिकेटसाठी त्याने राजस्थानला स्थलांतर केले. पण दुसऱ्या राज्याच्या या क्रिकेटपटूबाबत भेदभावाचे वातावरण असल्याने पंत पुन्हा दिल्ली संघात परतला. २०१५ मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्स संघात स्थान मिळवले, तर २०१६च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत उपविजेत्या भारताकडून पंतने छाप पाडली. यात १८ चेंडूंतील वेगवान अर्धशतकाचाही समावेश होता. २०१६-१७च्या रणजी हंगामात त्याने महाराष्ट्राविरुद्ध त्रिशतक (३०८) झळकावले होते. त्यामुळे जानेवारी २०१७ मध्ये पंतला ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली. मग २०१८ मध्ये त्याने कसोटी आणि एकदिवसीय पदार्पण केले. याच वर्षी ‘आयसीसी’चा उदयोन्मुख क्रिकेटपटूचा पुरस्कारही त्याने पटकावला.

गेल्या तीन वर्षांच्या क्रिकेट प्रवासात पंतची वारंवार धोनी आणि वृद्धिमान साहाशी तुलना झाली. के. एस. भरत, इशान किशन आणि संजू सॅमसन हे पर्यायसुद्धा शर्यतीत होते. पण संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवत पंत आता भारतीय संघाचा अविभाज्य भाग झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रेणीनिहाय मानधनरचनेतही पंतचा समावेश ‘अ’ श्रेणीत आहे.

पंतवरील खेळाचा ताण कमी करण्यासाठी साहाकडे कसोटीत, तर पंतकडे मर्यादित षटकांसाठी यष्टीरक्षणाची जबाबदारी देण्याचे प्रयोग झाले. पण धावांसाठी झगडणाऱ्या साहाच्या कारकीर्दीचे दुखापतीमुळेही मोठे नुकसान झाले. परिणामी पंतने कसोटी क्रिकेटमध्येही आपले स्थान भक्कम केले आहे. त्यामुळेच तूर्तास तरी यष्टीरक्षक-फलंदाजाचा प्रश्न पंतने सोडवला आहे.

पंतची धोनीशी तुलना करण्यापेक्षा त्याला त्याचा नैसर्गिक खेळ खेळू द्यावा. सध्या तो मिळालेल्या संधीचे सोने करीत स्वत:ची कामगिरी उत्तम बजावतो आहे. संघ व्यवस्थापनाचे पाठबळ असल्यामुळे त्याचा आत्मविश्वास उंचावला आहे. पंतला आव्हान देऊ शकेल अशी अन्य कोणत्याही यष्टीरक्षक-फलंदाजाची कामगिरी नाही, हेसुद्धा त्याच्या दृष्टीने अनुकूल आहे.

– चंद्रकांत पंडित, मध्य प्रदेशचे प्रशिक्षक

prashant.keni@expressindia.com