अव्वल दर्जाच्या मैदानांचा अभाव.. चांगल्या प्रशिक्षकांची वानवा.. शाळांकडून प्रोत्साहनाबाबत असणारी उदासीनता.. आदी प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत आसामचे खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील हॉकी स्पर्धामध्ये चमक दाखवत आहेत.
पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या सबज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी आसामचा संघ पात्र ठरला आहे. आसाममधील हॉकीच्या मैदानांबाबत प्रशिक्षिका कल्याणीदेवी डेका म्हणाल्या, ‘‘आमच्याकडे दोन-तीन ठिकाणीच अ‍ॅस्ट्रो टर्फची मैदाने आहेत. मात्र अनेक वेळा या मैदानांकरिता पुरेसे पाणी नसल्यामुळे आम्हाला तेथे सरावाची संधीच मिळत नाही. आमच्या राज्यात सर्वाधिक पाऊस पडत असला तरी हॉकीच्या मैदानांसाठी पाणी मिळत नाही. अनेक वेळा त्याकरिता स्थानिक प्रशासनाविरुद्ध संघर्ष करावा लागतो.’’
‘‘पुण्यातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी आम्हाला तब्बल चार दिवस रेल्वे प्रवास करावा लागला. ही केवळ आजची स्थिती नाही. कधी कधी आम्हाला दोन रेल्वे गाडय़ा बदलून व पाच-सहा दिवसांचा प्रवास करत स्पर्धेच्या ठिकाणी जावे लागते. एवढा प्रवास केल्यानंतर खेळाडूंची खूप दमछाक होते व अपेक्षेइतकी कामगिरी त्यांच्याकडून होत नाही. दुर्दैवाने या खेळासाठी पुरस्कर्ते मिळत नाहीत. अनेक वेळा खूप मिन्नतवाऱ्या केल्यानंतर तुटपुंजे प्रायोजक मिळतात. खेळाडूंच्या साधनसामुग्रीकरिता त्यांचे पालकच खर्च करतात.’’
कल्याणीदेवी यांनी स्पर्धात्मक हॉकीमध्ये फारसा भाग घेतलेला नाही. मात्र केवळ हॉकीच्या प्रेमापोटी त्यांनी राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्थेत या खेळाचा राष्ट्रीय अभ्यासक्रम पूर्ण केला व प्रशिक्षक म्हणून हॉकीत कारकीर्द सुरू केली आहे.
स्पर्धेतील कामगिरीविषयी कल्याणीदेवी म्हणाल्या की, ‘‘राष्ट्रीय स्पर्धेच्या चार दिवसआधी संघाची निवड करण्यात आली. त्यामुळे आमच्या खेळाडूंना केवळ तीनच दिवस सरावासाठी मिळाले. साहजिकच त्याचा परिणाम आमच्या कामगिरीवर झाला आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील खराब कामगिरी पाहता आम्ही वरिष्ठ गटात राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते, असे सांगूनही कुणाला खरे वाटणार नाही.’’