दुबईतील आशिया चषकात कर्णधार विराट कोहलीला दिलेल्या विश्रांतीवर निवड समितीचे माजी प्रमुख संदीप पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘द क्विंट’ या वृत्तपत्रासाठी लिहीलेल्या लेखात संदीप पाटील यांनी आपलं मत मांडलं आहे. साखळी फेरीत भारताला हाँग काँग आणि पाकिस्ताशी सामना करायचा आहे. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.

“निवड समितीचा माजी प्रमुख या नात्याने खेळाडूंवर अतिक्रिकेटमुळे दबाव येऊ शकतो ही गोष्ट मला मान्य आहे. मात्र ज्यावेळी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवला जाणार असतो त्यावेळी अनेक लाखो चाहते त्या सामन्याशी जोडले गेलेले असतात. इतकच नाही तर दोन्ही संघांचे खेळाडू आणि अधिकारीही या सामन्याची वाट पाहत असतात. अशावेळी विराटसारख्या खेळाडूला विश्रांती देण्याचा निर्णय पटत नाही. आशिया चषकाऐवजी विराटला वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत विश्रांती देता येऊ शकली असती.” पाटील यांनी आपलं मत मांडलं.

भारतीय संघात आताच्या घडीला असे अनेक खेळाडू आहे ज्यांच्यावर अतिक्रिकेटमुळे दबाव आलेला आहे. मग अशावेळी फक्त विराटलाच विश्रांती का दिली जाते? इतरही खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे असं म्हणत पाटील यांनी बीसीसीआयच्या निवड समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.

अवश्य वाचा – भारत-पाक सामन्यात कोहलीच्या अनुपस्थितीचा परिणाम होणार नाही- सौरव गांगुली