वर्षभराच्या संघर्षांनंतर जेतेपदाचा फैसला अखेरच्या सामन्यापर्यंत.. स्पॅनिश लीगच्या इतिहासात दुसऱ्यांदा जेतेपदासाठी अखेरच्या लढतीत दोन्ही संघ आमने-सामने.. अ‍ॅटलेटिको माद्रिदला जेतेपदासाठी विजय किंवा बरोबरी पुरेशी.. बार्सिलोनाला मात्र जेतेपद कायम राखण्यासाठी विजय आवश्यक.. अ‍ॅलेक्सीस सांचेझने ३३व्या मिनिटाला बार्सिलोनाला मिळवून दिलेली आघाडी.. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच अ‍ॅटलेटिको माद्रिदने साधलेली बरोबरी.. अखेरच्या मिनिटांत बार्सिलोनाने निर्णायक गोलसाठी केलेले प्रयत्न.. पण अ‍ॅटलेटिको माद्रिदने भक्कम बचावासह सामना १-१ असा बरोबरीत राखत तब्बल १८ वर्षांनंतर स्पॅनिश लीग चषकाला गवसणी घातली.
अ‍ॅटलेटिको माद्रिदने हा सामना बरोबरीत सोडवून ३८ सामन्यानंतर ९० गुणांची कमाई करून जेतेपदावर मोहोर उमटवली. १९९६नंतर प्रथमच अ‍ॅटलेटिकोने स्पॅनिश लीग चषकावर नाव कोरले. त्यांचे हे स्पॅनिश लीगचे १०वे जेतेपद ठरले. अ‍ॅटलेटिको माद्रिदने जेतेपदावर शिक्कामोर्तब केल्यानंतर घरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात बार्सिलोनाच्या जवळपास एक लाख चाहत्यांनी आणि अ‍ॅटलेटिको माद्रिदच्या ५०० चाहत्यांनी उभे राहून प्रशिक्षक दिएगो सिमोन यांच्या खडतर तपश्चर्येला कुर्निसात केला.
सेस्क फॅब्रेगसने दिलेल्या पासवर अ‍ॅटलेटिकोच्या बचावपटूंना चकवून अ‍ॅलेक्सीस सांचेझने ३३व्या मिनिटाला गोल केला. याच गोलाच्या आधारावर बार्सिलोना आपले जेतेपद कायम राखणार, असे वाटले होते. पण दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाल्यानंतर ४९व्या मिनिटाला कोके याने उजव्या कॉर्नरवरून दिलेल्या क्रॉसवर दिएगो गॉडिनने हेडरद्वारे चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. हाच बरोबरीच्या आधारावर अ‍ॅटलेटिको माद्रिदने जेतेपद पटकावले. आता या मोसमात सुरेख कामगिरी करणाऱ्या अ‍ॅटलेटिको माद्रिदला चॅम्पियन्स लीग जेतेपदावर नाव कोरण्यासाठी पुढील आठवडय़ात रिअल माद्रिदशी दोन हात करावे लागतील.