इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या पर्वाचा समारोप मंगळवारी झाल्यानंतर आता २०२१च्या मोसमासाठीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. २०२१ मध्ये सर्व संघातील संपूर्ण खेळाडूंचा लिलाव करायचा की विद्यमान संघासह १४वे पर्व खेळवायचे, याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्यांमध्ये खलबते सुरू आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.

डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात संपूर्ण खेळाडूंचा लिलाव करायचा, असे संकेत ‘बीसीसीआय’मधून मिळत आहेत. ‘बीसीसीआय’ने फ्रँचायझींसोबत याविषयी अनौपचारिक चर्चा केली आहे. ‘बीसीसीआय’चे सर्व पदाधिकारी सध्या दुबईत असल्याने पुढील २-३ आठवडय़ांत याविषयीचा निर्णय अपेक्षित आहे.

‘‘अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत पुढील मोसमाचे आयोजन करावयाचे आहे. वेळ कमी असला तरी संपूर्ण खेळाडूंचा लिलाव याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. ‘आयपीएल’ प्रशासकीय समिती पुढील दोन आठवडय़ांत याविषयी अधिकृत निर्णय घेऊ शकेल. प्रत्येकाशी समन्वय साधण्याचे काम सुरू आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

सर्व खेळाडूंचा लिलाव करण्याआधी संघांची संख्या वाढवण्यात येईल, असे संकेत ‘बीसीसीआय’ने २०१८ मध्येच दिले होते; पण २०२१ मध्ये संघांची संख्या वाढवण्याचे कोणतेही प्रयोजन नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्व खेळाडूंचा लिलाव झाल्यास, यंदाच्या मोसमात खराब कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला दिलासा मिळू शकेल. पुढील वर्षीच्या लिलावासंदर्भात ‘बीसीसीआय’ काय निर्णय घेते, यावर आमचे संघबांधणीचे स्वरूप अवलंबून असेल, असे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अखेरच्या सामन्याच्या पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केले होते.