बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा २४७ धावांनी दारूण पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचा दुसरा डाव २४० धावांत आटोपला. न्यूझीलंडकडून सलामी फलंदाज टॉम ब्लंडेलने सर्वाधिक १२१ धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून फिरकी गोलंदाज नॅथन लायनने चार बळी घेतले. युवा ट्रेव्हिस हेडला सामनावीरच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. हेडने पहिल्या डावांत ११४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. ट्रेव्हिस हेडने कसोटी कारकीर्दीतील तसेच वर्षांतील दुसरे शतक झळकावले. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने नाबाद १६१ धावांची खेळी साकारली होती.

दरम्यान सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पॅट कमिन्सने (५/२८) केलेल्या भेदक गोलंदाजीला जेम्स पॅटिन्सन (३/३४) आणि मिचेल स्टार्क (२/३०) यांची उत्तम साथ लाभल्यामुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव फक्त १४८ धावांत गुंडाळला होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३१९ धावांची आघाडी मिळूनही फॉलोऑन लादला नाही. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव पाच बाद १६८ धावांवर घोषित केला.  त्यापूर्वी, शुक्रवारच्या २ बाद ४४ धावांवरून पुढे खेळताना न्यूझीलंडचा डाव कमिन्स, स्टार्क आणि पॅटिन्सनच्या त्रिकुटापुढे कोलमडला. पहिल्या डावांत टॉम लॅथम (५०) वगळता न्यूझीलंडचा एकही फलंदाज २०हून अधिक धावा करू शकला नाही.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ४६७, १६८/५ घोषित
न्यूझीलंड : १४८, २४०