ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेनने स्टीव्ह स्मिथला कर्णधार होण्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे. स्टीव्ह स्मिथ पुन्हा कर्णधार होण्यासाठी मी त्याला पूर्ण पाठिंबा देईन, असे त्याने म्हटले आहे. २०१८मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध बॉल टेंपरिंगच्या घटनेनंतर स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरून काढून टाकले गेले होते. त्यानंतर टीम पेनला स्मिथच्या जागी कर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली.

 

टिम पेनच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघाची कामगिरी तितकी चांगली झाली नाही. कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मैदानावर २-१ असा पराभव केला. या पराभवानंतर पेनच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित झाले. अनेकांनी त्याला हटविण्याची मागणी केली. दरम्यान, स्मिथला पुन्हा कर्णधार केले जावे, अशीही चर्चा समोर आली.

फॉक्स क्रिकेटच्या वृत्तानुसार, स्मिथला पुन्हा कर्णधारपद मिळावे का, असा प्रश्न पेनला विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “मला वाटते की त्याला आणखी एक संधी मिळाली पाहिजे. निश्चितच हा निर्णय माझ्या हातात नाही, परंतु स्मिथ एक जबरदस्त कर्णधार होता. तो एक अतिशय हुशार रणनीतिकार आहे.”

टिम पेनच्या म्हणण्यानुसार, केप टाऊन घटनेच्या वेळी स्टीव्ह स्मिथ कर्णधार म्हणून परिपक्व होता. तो म्हणाला, “जेव्हा मी तस्मानियासाठी माझ्या कर्णधारपदाची कारकीर्द सुरू केली, तेव्हा तो माझ्यासारखाच होता. अगदी लहान वयातच त्याला अशी मोठी जबाबदारी देण्यात आली होती. जेव्हा मी संघात रुजू झालो, तेव्हा तो कर्णधार म्हणून परिपक्व होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ती घटना घडली. त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. पण पुन्हा कर्णधारपद मिळविण्यासाठी मी नक्कीच त्याला साथ देईन.”