ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉजने बीसीसीआयवर एक गंभीर आरोप केला आहे. हॉजने १० वर्षांपूर्वीचे आयपीएल मानधन न मिळाल्याचा खुलासा केला आहे. २०११मध्ये तो तत्कालिन कोची टस्कर्स केरळ संघाचा भाग होता. या काळातील पैसे बाकी राहिल्याचे हॉजने सांगितले.

ब्रॅड हॉजने उघड केले, की आयपीएल २०११मध्ये कोची टस्कर्स केरळचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना अद्याप ३५ टक्के मानधन मिळालेले नाही. बीसीसीआयने ही रक्कम ट्रान्स्फर करणार असल्याचे सांगितले होते. आयपीएल सुरू झाल्यापासून ब्रॅड हॉज सात हंगामांकरिता लीगचा भाग होता. त्याने केकेआर, कोची आणि राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले. अष्टपैलू खेळाडूने ६६ सामन्यांत १४०० धावा आणि १७ गडी बाद केले.

हेही वाचा – ट्वीट करून शूजसाठी स्पॉन्सर मागणाऱ्या झिम्बाब्वेच्या ‘त्या’ क्रिकेटपटूवर होणार कारवाई?

 

टेलीग्राफ क्रिकेटच्या नुकत्याच आलेल्या अहवालात बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंना आयसीसी स्पर्धेचे मानधन न दिल्याचे समोर आले होते. या टीमच्या सदस्यांपैकी कोणाला पैसे मिळाले नसल्याचे प्रकाशकाने उघड केले. प्रत्येकाला ३००० अमेरिकन डॉलर्स मिळणे बाकी होते. या अहवालानंतर क्रिकेटविश्वात गोंधळ उडाला आणि पुरुष आणि महिला क्रिकेटमधील भेदभाव केल्याबद्दल अनेक लोकांनी बीसीसीआयवर जोरदार टीका केली. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्टी केली, की या आठवड्याच्या अखेरीस खेळाडूंना त्यांच्या थकबाकीची रक्कम दिली जाईल. करोनामुळे मानधन लांबल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोची टस्कर्स केरळ ही वादग्रस्त फ्रेंचायझी फक्त एका मोसमात आयपीएलचा एक भाग होता. या संघाने २०११मध्ये टी-२० लीगमध्ये भाग घेतला होता. अगदी सुरुवातीपासूनच कोची टस्कर्स चुकीच्या कारणांमुळे चर्चेत होती, ज्यामध्ये अंतर्गत भागधारकांमध्ये भांडणासंबंधी वृत्त आले होते.

हेही वाचा – IPL : जेव्हा मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला दाखवले होते ‘तारे’!