बॉल टॅम्परिंग प्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक वर्षांची बंदी घातली आहे. यामुळे स्मिथ आणि वॉर्नरचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. स्मिथचे ३.५ मिलियन डॉलर्सचे (सुमारे २३ कोटी रुपये) तर वॉर्नरचे २.९ मिलियन डॉलर्सचे (सुमारे २० कोटी रुपये) नुकसान होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बॉल टॅम्परिंगचा प्रकार घडला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बडतर्फ कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांसाठी बंदी घातली आहे. यामुळे दोघांना आगामी काळात होणाऱ्या मालिकांमध्ये खेळता येणार नाही. या बंदीमुळे दोघांना कोट्यवधी रुपयांच्या कमाईवर पाणी सोडावे लागणार आहे.

वर्षभरासाठी बंदी घातल्याने स्मिथ आणि वॉर्नरला २६ एकदिवसीय आणि १० टी- ट्वेंटी सामन्यांमध्ये खेळता येणार नाही. याशिवाय या कालावधीत ऑस्ट्रेलियन संघ १२ कसोटी सामने देखील खेळणार आहे. यात भारताविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचाही समावेश आहे. भारतीय संघ नोव्हेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेसाठी जाणार आहे. तर फेब्रुवारी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया संघ पाच एकदिवसीय आणि दोन टी- ट्वेंटी सामन्यांसाठी भारतात येणार आहे. तसेच या दोघांना यावर्षी आयपीएलमध्येही खेळता येणार नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना सर्वाधिक मानधन दिले जाते. त्यामुळे या दोघांचे नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे.

स्मिथचे सुमारे ३.५ मिलियन डॉलर्सचे म्हणजेच भारतीय चलनानुसार २३ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. तर वॉर्नरचे ३ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. सामन्यांसाठी मिळणारे मानधन आणि आयपीएलमधील करार याचा यात समावेश आहे. मात्र, हे खेळाडू ज्या कंपन्यांची जाहिरात करतात त्याचा यात समावेश नाही. हे खेळाडू ज्या कंपन्यांची जाहिरात करतात त्या कंपन्या देखील करार रद्द करतील, अशी शक्यता आहे. ‘एलजी’ने वॉर्नरशी नव्याने करार करणार नाही, असे संकेत दिले होते. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना बॉल टेम्परिंगचे प्रकरण चांगलेच महागात पडले आहे.