विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आपापल्या प्रतिस्पध्र्यावर दिमाखदार विजय मिळवणारा बांगलादेश आणि न्यूझीलंडचा संघ बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. या लढतीतसुद्धा विजयी कामगिरी करून गुणतालिकेत अग्रस्थान पटकावण्यासाठी उभय संघ सज्ज असल्याने चाहत्यांसाठी हा सामना मनोरंजनाची पर्वणी ठरू शकते.

झुंजार बांगलादेशने त्यांच्या पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला २१ धावांनी पराभूत केले. अनुभवी शाकिब अल हसन, मुशफिकर रहिम यांची अर्धशतके आणि रियाज महमदुल्लाहची फटकेबाजी बांगलादेशसाठी उपयुक्त ठरली. गोलंदाजीत मुस्तफिझुर रेहमानने प्रभावी कामगिरी केली. त्याचप्रमाणे मश्रफी मोर्तझाच्या कल्पक नेतृत्वाचीही क्रीडाविश्व कौतुक करत आहे. म्हणूनच बुधवारी न्यूझीलंडलासुद्धा बांगलादेशपासून सावध रहावे लागेल.

दुसरीकडे न्यूझीलंडने पहिल्या लढतीत श्रीलंकेवर सर्वच आघाडय़ांवर वर्चस्व गाजवत १० गडी राखून विजय मिळवला. मॅट हेन्री, लॉकी फग्र्युसन आणि कॉलिन डी’ग्रँडहोम यांच्या वेगवान माऱ्यापुढे श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली. त्यानंतर सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुन्रो यांनी शानदार फटकेबाजी करत न्यूझीलंडचा विजय साकारला. न्यूझीलंडने आफ्रिकेसारखा हलगर्जीपणा न करता नेहमीच्या आक्रमक स्वरूपात खेळ केल्यास ते बांगलादेशवर नक्कीच विजय मिळवू शकतील.

सामना क्र. 9

न्यूझीलंड वि. बांगलादेश

स्थळ : द ओव्हल, लंडन ’सामन्याची वेळ : सायंकाळी ६ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ३, स्टार स्पोर्ट्स

सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २, स्टार प्रवाह मराठी.

संघ

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), रॉस टेलर, मार्टिन गप्तिल, कॉलिन मन्रो, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), कॉलिन डी’ग्रँडहोम, जेम्स निशाम, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, मिचेल सँटनर, इश सोधी, टॉम ब्लंडेल, लॉकी फग्र्युसन, हेन्री निकोल्स.

बांगलादेश : मश्रफी मोर्तझा (कर्णधार ), तमिम इक्वाल, सौम्य सरकार, लिटन दास, मुशफिकर रहीम, महम्मदुल्ला, शाकिब अल हसन, महम्मद मिथुन, साबीर रहमान, मुसद्दीक हुसेन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहदी हसन, रुबेल हसन, मस्तफिझूर रहमान, अबू झायेद.

आमनेसामने

एकदिवसीय

सामने : २९, न्यूझीलंड : २४, बांगलादेश : ५, टाय / रद्द : ०

विश्वचषकात    

सामने : ४, न्यूझीलंड : ४,

बांगलादेश : ०, टाय / रद्द : ०