सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज बासिल थंपी याने आपल्या शानदार प्रदर्शननाच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाचे दार ठोठावण्यास सुरूवात केली आहे. आयपीएल २०१७ मध्ये थंपी ‘सर्वश्रेष्ठ उदयोन्मुख खेळाडू‘ ठरला होता, त्यानंतर त्याची श्रीलंका दो-यातील भारतीय संघात निवडही झाली होती. ‘सर्वश्रेष्ठ उदयोन्मुख खेळाडू‘ ते भारतीय संघात निवड याबाबतचा थंपीचा अनुभव कसा होता हे सांगणारी त्याची मुलाखत हिंदुस्थान टाइम्सने प्रसीद्ध केली आहे.

श्रीसंत मला प्रेरणा देतो-
स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेट कारकिर्द संपलेला वेगवान गोलंदाज श्रीसंत याचं थंपीच्या जीवनात महत्त्वाचं स्थान आहे. थंपीला सल्ला देणा-यांच्या यादीत श्रीसंतचं स्थान सर्वात महत्त्वाचं आहे. मला काही शंका असल्यास मी श्री भाईसोबत बोलतो, कधी काही अडचण असेल आणि काय करावं समजत नसेल तर मी त्याला मेसेज करतो आणि त्याचाही मला रिप्लाय येतो असं थंपी म्हणाला. मी कोणत्या परिस्थितीत काय करावं याबाबत तो मला समजावतो. श्रीसंत मला प्रेरणा देतो, असं थंपी म्हणाला.

गोलंदाजीत मिश्रण करण्याचा माझा प्रयत्न-
मी कोणाशीही स्पर्धा करत नाही. माझी गोलंदाजी कशी आहे हे मला चांगलं समजतं. माझ्याकडे खूप जास्त स्विंग नाहीये. त्यामुळे मी केवळ योग्य लेंथवर वेगात चेंडू टाकण्याचं काम करतो. गेल्यावर्षी मी बरेच यॉर्कर चेंडू टाकले होते, पण यंदा गोलंदाजीत मिश्रण करण्याचा माझा प्रयत्न असेल आणि त्यावरच मी काम करत आहे.