करोना विषाणू संसर्गाविरुद्धची लढाई म्हणजे कसोटी क्रिकेटच्या दुसऱ्या डावाप्रमाणे आहे म्हणजे जिथून लोकांना पराभव मान्य नसतो, याकडे भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेने लक्ष वेधले.

‘‘करोनाविरुद्धची लढाई ही सर्वाची आहे. कसोटी क्रिकेटप्रमाणे करोनाविरुद्धची लढाई आहे. कसोटी क्रिकेट पाच दिवसांचे असते. मात्र करोनाविरुद्धची लढाई किती काळ चालेल हे कोणीही सांगू शकत नाही. कसोटी क्रिकेट हे दोन डावांचे असते. मात्र सध्याची लढाई ही अधिक काळ सुरू राहणारी आहे. या लढाईत पहिल्या डावातील आघाडीवर आत्मसंतुष्ट होऊन चालणार नाही कारण दुसरा डावदेखील खडतर आहे,’’ असे कुंबळेने म्हटले. ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे असेही कुंबळेने सांगितले. ‘‘पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर आपल्याला जिंकता येणार नाही. या लढाईत संपूर्णपणे विजय नोंदवण्याची गरज आहे,’’ असे माजी लेगस्पिनर कुंबळेने सांगितले.

कुंबळेने आरोग्यसेवेशी संबंधित प्रत्येकाला धन्यवाद दिले. ‘‘करोनाविरुद्धच्या लढाईतील योद्धय़ांना म्हणजेच डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील कर्मचारी वर्ग, निर्जंतुकीकरण करणारे कर्मचारी, स्वयंसेवक, सरकारी कर्मचारी, पोलीस या सर्वाचे आभार मानतो. ते नि:स्वार्थीपणे सेवा करत आहेत,’’ असे कुंबळेने सांगितले.