सध्या आयपीएलचा हंगाम सुरु आहे. या हंगामात अनेक परदेशी खेळाडू आपला ठसा उमटवत आहेत आणि भारतीय चाहत्यांची मने जिंकत आहेत. अशाच टी२० लीग स्पर्धा परदेशातही आयोजित केल्या जातात. मात्र, परदेशातील टी२० स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू खेळताना दिसत नाहीत.

हा केवळ योगायोग नाही, तर बीसीसीआयच्या आणि आयपीएलच्या नियमानुसार हे घडत आहे. याचे कारण बीसीसीआय आणि आयपीएलच्या करारानुसार भारतीय खेळाडूंना देशाबाहेरील टी२० लीगमध्ये खेळण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र लवकरच धोनी, विराट हे खेळाडू बिग बॅश लीग सारख्या मोठ्या परदेशी टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसू शकतात.

‘इंडियन एक्सप्रेस’च्या माहितीनुसार, बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिल आयपीएलमध्ये खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना देशाबाहेरील टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळण्यास परवानगी देण्याच्या मुद्द्यावर पुनर्विचार करत आहे. सध्या आयपीएलमधील विविध संघाकडून खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंना इतर देशातील टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे व्यस्त वेळापत्रक आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन बड्या क्रिकेट मंडळांनी या संदर्भात बीसीसीआयवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.

बीसीसीआय आणि आयपीएल त्यांच्या निर्णयावर सुमारे १० वर्षे ठाम आहेत. मात्र तसे असले तरी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन बड्या क्रिकेट मंडळांनी भारतीय खेळाडूंना आपल्या टी२० लीग स्पर्धांमध्ये खेळण्यास पाठवण्याबाबत बीसीसीआयवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या संबंधीचा निर्णय लवकरात लवकर घेतला जाण्याची शक्यता आहे.