देशभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, बीसीसीआयने आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा काही काळासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. सर्व भारतीय खेळाडूंनीही या काळात स्वतःला घरामध्ये बंदिस्त करत आपल्या चाहत्यांना प्रशासकीय यंत्रणांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे. इंडिया टुडे वृत्त समुहाने दिलेल्या बातमीनुसार, परिस्थिती नियंत्रणात न आल्यास बीसीसीआय वर्षाच्या अखेरीस छोटेखानी स्पर्धा खेळवू शकते. मार्च महिन्याच्या अखेरीस यावर निर्णय घेतला जाणार आहे, मात्र तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात न आल्यास बीसीसीआय यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द करण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा – Video : लहानग्या समायरला ‘हिटमॅन’ देतोय फलंदाजीचे धडे

देशभरात सध्या करोनामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरु यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आढळत आहे. परदेशातून आलेल्या रुग्णांना सरकार क्वारंटाईन करत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बहुतांश राज्यांनी ३१ मार्चपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता सर्व सेवा बंद ठेवल्या आहेत. रेल्वे, मेट्रो, आंतरराज्य बससेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, मात्र खेळाडूंची सुरक्षा अधिक महत्वाची असल्याचं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने याआधीच स्पष्ट केलंय.

बीसीसीआयचे उच्च अधिकारी दर आठवड्याला परिस्थितीचा आढावा घेत आहेत. २४ मार्चरोजी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अधिकारी आणि सर्व संघमालक यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा होणार आहे. या बैठकीत आयपीएलच्या भवितव्याबद्दल निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेही १५ एप्रिलनंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन आयपीएलला परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे.

अवश्य वाचा – चेन्नई सुपरकिंग्जचा महत्वाचा खेळाडू झाला बाबा