महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णीने आशियाई महिला आणि खुल्या बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपदाच्या दिशेने दमदार वाटचाल केली. आठव्या फेरीत भक्तीने ली झेयुईवर मात केली. या फेरीअखेर तिचे ६.५ गुण झाले आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या खेळाडूंच्या तुलनेत भक्ती अध्र्या गुणाने पुढे आहे. चिगोरिन पद्धतीचा अवलंब करत भक्तीने दिमाखदार विजय मिळवला.
खुल्या गटात भारताच्या बी. अधिबनला पराभवाला सामोरे जावे लागले. व्हिएतनामच्या ली क्वांगने अधिबनला नमवले. एस.पी. सेतुरामनने जहांगीर वाखीदोव्हचा पराभव केला.
अन्य लढतींमध्ये सौम्या स्वामीनाथनने आर. वैशालीवर मात केली. सौम्यासह साडुकासोव्हा, ली झेयी, गुलरुखबेगिम टोखिरजोनोव्हा प्रत्येकी पाच गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानी आहेत.
व्हिएतनामच्या होआंग थी बाओ ट्रामविरुद्धची लढत बरोबरीत सुटल्याने भारताच्या पद्मिनी राऊतच्या अव्वल तीनमध्ये येण्याच्या आशा मावळल्या आहेत.
सूर्याशेखर गांगुली, विदित गुजराती, दीप सेनगुप्ता, अरविंद चिदंबरम आणि बी. अधिबन हे ५.५ गुणांसह खुल्या गटात संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहेत. या चौघांनाही अव्वल पाचमध्ये स्थान पटकावण्याची संधी आहे.