ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन कसोटीत पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय क्रिकेट संघास दिलासा मिळणार आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी त्यांचा भरवशाचा द्रुतगती गोलंदाज भुवनेश्वरकुमार तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. भुवनेश्वरकुमारने मंगळवारी येथे संघाच्या सरावात भाग घेतला. मात्र सराव सुरू असताना पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्यामुळे त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.
२४ वर्षांचा खेळाडू कुमार याला पहिल्या कसोटीपूर्वीच सराव सामन्यात दुखापत झाली होती. त्याचा घोटा दुखावला होता. त्यामुळे पहिल्या दोनही सामन्यात तो खेळू शकला नव्हता. भारताने त्याचा सहभाग अनिश्चित झाल्यानंतर धवल कुलकर्णी याला भारतामधून पाचारण केले होते. २६ डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी कुमार उत्सुक झाला आहे.