cricket-blog-ravi-patki
दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यास 2 ऑक्टोबरला पहिल्या T-20 ने सुरूवात होत आहे. T-20 झाल्यावर एकदिवसीय सामने आणि नंतर कसोटी सामने होणार आहेत. आफ्रिका फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्वच बाबतीत मजबूत संघ आहे. भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळणार असल्याने मालिका अटीतटीची होईल, असे वाटते. भारतीय खेळाडू आफ्रिकेच्या वर्तमान सर्व खेळाडूं विरुद्ध खेळले आहेत. सर्वाना सर्वांचा खेळ माहिती आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू दाखल झाला की तो फिनिश्ड प्रॉडक्ट असतो, असे मानले जाते. त्याला तंत्र मंत्र घोटवून देण्याची गरज नसते. गरज असते ती अशा छोट्या छोट्या सल्ल्यांची की ज्यामुळे अपयशावर रामबाण औषध सापडून यश पदरात पडेल किंवा थोड्या यशाचे रूपांतर मोठ्या यशात होऊ शकेल. अशा नेमक्या पिनपॉइंट सल्ल्याकरता असतात प्रशिक्षक. थोडासा स्टांसमधला बदल फलंदाजाला धो धो धावा देऊन जातो तसंच गोलंदाजीतील छोटीशी युक्ती यश द्यायला पुरेशी असते. आफ्रिकेविरुद्ध आपल्या खेळाडूंना गरज आहे ती आपल्या गोलंदाजी प्रशिक्षकांकडून मिळणाऱ्या नेमक्या, अभ्यासपूर्ण आणि निर्णायक सल्ल्याची. त्याचं कारण असं की आफ्रिका संघातील अनेक खेळाडू इम्प्रोवायझेशनचे सम्राट आहेत. त्यांच्याकडे एका चेंडू करता अनेक फटके आहेत. त्यामुळे या खेळाडूंच्या अचाट गुणवत्तेचा आणि इंप्रोवायझेशनचा अभ्यास करून खेळताना त्यांच्या मनसुब्यांविषयी तर्क बांधून गोलंदाजीत जो चातुर्य दाखवेल तो यशस्वी होईल.डी विलियर्सचे मनसूबे ओळखून गोलंदाजी करणारा यशस्वी होईल. आता मनसुबे ओळखायचे कसे?त्याचेच प्रशिक्षण व्हिडीओ विश्लेषण करून गोलंदाजी प्रशिक्षक करु शकतात. म्हणूनच ते एक्स्पर्ट म्हणवले जातात. डी विलियर्सला बांधून कसा ठेवायचा, ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन तो फाइन लेगला फटका मारणार याचा तर्क कसा करायचा, रिवर्स स्वीपचा अंदाज कसा बांधायचा या सर्व गोष्टींचा आराखडा फंलंदाजाच्या हालचाली आणि बॉडी लँग्वेज वरून ओळखता येऊ शकतात. अगदी १० पैकी १० वेळेस अंदाज बरोबर येणार नाही, फलंदाज देखील विलक्षण तयारीचा असल्याने तो पण प्रतिडाव खेळणारचं. पण अभ्यास करून आणि भरपूर सराव करून उतरलं तर डिविलियर्स, डुप्लीसि, मिलर यांच्या युक्त्यांची उत्तरे आपल्याकडे असतील.(बरेच लोक म्हणतात ‘अरे डिविलियर्स समोर कसले डावपेच आणि कसली प्रशिक्षकाची रणनीती. तो सगळ्याच्या पुढे गेला आहे’. पण प्रत्येक कठीण आव्हानाला क्रिकेटमध्ये उपाय सापडला आहे हे विसरून कसे चालेल?) म्हणूनच आफ्रिकेविरुद्ध पहिली परीक्षा आहे आपले गोलंदाजी प्रशिक्षक बी. अरूण यांची. त्यांचा अभ्यास आणि त्यांनी गोलंदाजांकडून करून घेतलेले स्मार्ट काम अफ्रिकेला आश्चर्याचा धक्का देऊ शकते. अर्थात खेळाडू फील्डवर युक्तया लढवण्यात कितपत यशस्वी होतात, यावर बरच अवलंबून आहे.
south-africa बांगलादेशात आपण वन डे मालिका हरलो त्या अपयशाला अनेक कारणे होती. पण त्यातील एक प्रमुख कारण नवख्या मुस्तफीझुर रेहमानच्या गोलंदाजीचा काहीही अभ्यास प्रशिक्षकानी केला नव्हता असे वाटले. तो गोलंदाज जरी अगदी नवखा असला, तरी क्रिकेटचे विश्व छोटे आहे. त्याचा डेटा मिळवायलाच पाहिजे होता. आपला सपोर्ट स्टाफ निश्चित कमी पडला. संजय बांगरला नक्की हळहळ वाटली असणार.
आत्ताच्या आफ्रिकीच्या मालिकेत प्रशिक्षकांची प्रतिष्ठा पणाला लागेल हे निश्चित!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com