पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. या सामन्यात दोन भावंडाची जोडी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली. भारतीय संघाकडून हार्दिक आणि कृणाल पंड्या तर, इंग्लंडकडून सॅम आणि टॉम करन मैदानात उतरले. कृणालने आपल्या वनडे कारकिर्दीची सुरुवात या सामन्याने केली.
‘पंड्या ब्रदर्स’ ही एकदिवसीय सामन्यात एकत्र खेळणारी भारताची तिसरी जोडी आहे. त्याच्या आधी मोहिंदर आणि सुरिंदर अमरनाथ, इरफान आणि युसुफ पठाण यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
अमरनाथ बंधुंनी भारताकडून तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर, पठाण बंधुंनी भारताकडून आठ एकदिवसीय आणि आठ टी-20 सामने खेळले आहेत. तर, टॉम आणि सॅम या करन बंधुंनी यापूर्वी ऑक्टोबर 2018मध्ये श्रीलंकेविरूद्ध इंग्लंडकडून एकदिवसीय सामना खेळला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळणारी बंधुंची जोडी अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये मोडते. त्यापैकी केवळ कृणाल फिरकी गोलंदाज आहे. तर टॉम, सॅम आणि हार्दिक वेगवान गोलंदाज आहेत.
कृणालचा विश्वविक्रम
एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणाऱ्या कृणालने 31 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 58 धावा फटकावल्या. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज म्हणून कृणाल पंड्याच्या नावावर मोठा विक्रम झाला आहे. कृणालने 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.