ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर यांचे मत

मेलबर्न : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात डिसेंबर महिन्यात रंगणारी ‘बॉक्सिंग-डे’ कसोटी प्रेक्षकांविना खेळवण्यात आल्यास त्या कसोटीचे महत्त्व कमी होईल, असे स्पष्ट मत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मार्क टेलर यांनी व्यक्त केले.

३ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेच्या आयोजनासाठी दोन्ही देशांकडून अथक परिश्रम घेतले जात आहेत. मात्र २६ डिसेंबरला मेलबर्न येथे होणाऱ्या ‘बॉक्सिंग-डे’ कसोटीसाठी किमान ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी टेलर यांनी केली आहे. ‘‘ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासात ‘बॉक्सिंग-डे’ कसोटीचे फार महत्त्व आहे. त्यामुळे वर्षांखेरीस भारताविरुद्ध होणाऱ्या या कसोटीसाठी प्रेक्षकांना प्रवेश नाकारण्यात आला तर ते फारच निराशाजनक ठरेल. स्टेडियमच्या प्रेक्षक क्षमतेपैकी किमान ५० टक्के चाहत्यांना तरी प्रवेश देण्यात यावा. यामुळे चाहत्यांसह खेळाडूंच्या उत्साहातसुद्धा भर पडेल,’’ असे ५५ वर्षीय टेलर म्हणाले.

सध्या मेलबर्नमध्ये करोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्याने हा सामना पर्थ अथवा अन्य एखाद्या स्टेडियमवर हलवण्यात येण्याची शक्यताही बळावली आहे. ‘‘मेलबर्नमधील सद्य:स्थिती पाहता ‘बॉक्सिंग-डे’ कसोटी अन्य ठिकाणी खेळवणेच सोयीचे ठरेल. जर मेलबर्नमध्येच सामना खेळवण्यात आला तर फक्त १० अथवा २० हजारांपर्यंतच प्रेक्षकांना प्रवेश मिळू शकेल. त्या तुलनेत पर्थ अथवा अ‍ॅडलेड येथे हा सामना खेळवून किमान या एका कसोटीसाठी अधिकाधिक चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाऊ शकतो,’’ असेही टेलर यांनी सांगितले. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेननेसुद्धा ‘बॉक्सिंग डे’ कसोटी मेलबर्नऐवजी अन्य ठिकाणी खेळवण्यात यावी, अशी मागणी केली होती.