ब्रिस्बेनच्या मैदानावर उद्यापासून भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. मालिकेतील हा अखेरचा आणि निकाल निश्चित करणारा कसोटी सामना आहे. या कसोटीआधी भारतीय संघासमोर दुखापतींचे आव्हान आहे. रविंद्र जाडेजा, हनुमा विहारी आणि जसप्रीत बुमराह हे भारताचे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त आहेत.

आणखी वाचा- IND vs AUS: स्मिथच्या बचावासाठी प्रशिक्षक लँगर मैदानात, म्हणाले…

“भारतीय संघाचे वैद्यकीय पथक जसप्रीत बुमराहच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशीच बुमराहचा संघात समावेश करायचा की, नाही? याचा निर्णय घेतला जाईल” असे भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सांगितले. सिडनी कसोटीत बुमराहला दुखापत झाली होती. पहिल्या तीन कसोटींप्रमाणे याही सामन्याच्या आधी टीम इंडिया आपला संघ जाहीर करणार नाही.

आणखी वाचा- IND vs AUS: चौथ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलियाला धक्का; महत्त्वाच्या फलंदाजाची माघार

“वैद्यकीय टीम बुमराहसोबत आहे. आपल्याला उद्या सकाळपर्यंत थांबावे लागेल. बुमराह कसोटीसाठी फिट असेल, तर चांगली गोष्ट आहे आणि असं घडलं नाही, तर आम्ही त्या परिस्थितीचा सामना करु” असे प्रशिक्षक विक्रम राठोड सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. या दौऱ्यातील टीम इंडियाच्या मानसिक कणखरतेचे त्यांनी कौतुक केले. “तयारीतून कणखरपणा येतो. सर्व खेळाडू मेहनत करतायत. त्यांचा त्यांच्या क्षमतांवर विश्वास आहे” असे विक्रम राठोड म्हणाले. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही टीम १-१ अशा बरोबरीत आहेत. त्यामुळे ब्रिस्बेन कसोटी निर्णायक ठरेल. गाबाच्या या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघ १९८८ नंतर एकदाही पराभूत झालेला नाही.