आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनी निवृत्ती घेणार की नाही याबद्दल चर्चा सुरु असल्या तरीही आयपीएलमध्ये धोनी पुढची काही वर्ष खेळत राहिल हे आता स्पष्ट झालं आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव आता जवळ येऊन ठेपला आहे, १९ डिसेंबर रोजी कोलकाता शहरात हा लिलाव पार पडेल. मात्र २०२१ च्या हंगामासाठी धोनीने स्वतःहून चेन्नईची साथ सोडण्याची तयारी दाखवली आहे. पुन्हा एकदा लिलावात उतरुन स्वतःला कमी किमतीत पुन्हा विकत घेण्याचा पर्याय धोनीने संघमालकांना दिल्याचं कळतंय.

“२०२१ च्या आयपीएलसाठी मोठा लिलाव पार पडेल, आणि धोनीने आम्हाला स्पष्ट केलं आहे की तो आयपीएलमध्ये खेळणार आहे. त्यामुळे टी-२० स्पर्धेतून त्याच्या निवृत्तीचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र गेली काही वर्ष चेन्नईचा संघ धोनीला कायम राखत आला आहे. मात्र इतर खेळाडूंनाही न्याय मिळावा यासाठी धोनीने स्वतः पुन्हा एकदा लिलावात उतरण्याची तयारी दाखवली आहे. २०२१ च्या लिलावात चेन्नई धोनीवर पुन्हा बोली लावू शकते किंवा राईट टू मॅच कार्डाद्वारे संघ धोनीला पुन्हा आपल्याकडे कायम राखू शकतो. खुद्द धोनीनेच आमच्याकडे हा पर्याय दिला आहे.” चेन्नई सुपरकिंग्जच्या सुत्रांनी टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला माहिती दिली.

धोनी हा चेन्नई संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे, त्यामुळे आम्ही त्याला शक्यता लिलावात उतरु देणार नाही असं सुत्रांनी स्पष्ट केलं. दरम्यान, निवड समितीने आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता, धोनीला आता संघात स्थान मिळणार नाही हे पक्क केलेलं आहे. धोनीऐवजी ऋषभ पंत सध्या मर्यादीत षटकांच्या सामन्यात यष्टीरक्षकाची भूमिका बजावतो आहे. मध्यंतरी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार की नाही हे त्याच्या आगामी आयपीएलमधील कामगिरीवर अवलंबून असेलं असं म्हटलं होतं. त्यामुळे आगामी काळात धोनी आपल्या निवृत्तीबद्दल कधी निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.