भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्याच सामन्यात ६६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आरोन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ या दोघांनी ठोकलेल्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी ३७५ धावांचे महाकाय आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग टीम इंडियाला ३०८ धावांपर्यंतच मजल मारता आली. हार्दिक पांड्या (९०) आणि शिखर धवन (७४) यांनी बराच काळ झुंज दिली पण अखेर भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह यजमानांनी ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याच्याबाबतीत मजेशीर गोष्ट घडली. लॉकडाउन काळात त्याने टीक टॉक आणि इन्टाग्रामच्या माध्यमातून अनेकांचं मनोरंजन केलं. केवळ हैदराबादच नव्हे तर पूर्ण भारतभरात त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली. डेव्हिड वॉर्नर, त्याची पत्नी आणि लेक यांच्या बुट्टा बोम्मा गाण्यावरील डान्सचा तर एक वेगळाच चाहताच वर्ग आहे. वॉर्नरने या गाण्यावर केलेला डान्स साऱ्यांनाच लक्षात होता. त्यामुळे सामना सुरू असताना स्टेडियममधील चाहत्यांनी वॉर्नरला फिल्डिंग करताना बुट्टा बोम्मा वर डान्स करायला सांगितला. आणि वॉर्नरनेदेखील चाहत्यांचा मान राखत लगेच त्या डान्सच्या काही स्टेप्स करून दाखववल्या.

पाहा तो व्हिडीओ-

दरम्यान, त्याआधी, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना १७५ धावांची सलामी दिली. डेव्हिड वॉर्नर ६९ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार फिंच आणि स्टिव्ह स्मिथ यांनी धडाकेबाज शतकं ठोकलं. फिंचने ११४ तर स्मिथने १०५ धावांची खेळी केली. IPLमध्ये फ्लॉप ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलने १९ चेंडूत ४५ धावा ठोकल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ३७४ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा सामना करताना भारताचे आघाडीचे फलंदाज उसळत्या चेंडूला बळी पडले. सलामीवीर मयंक अग्रवाल, कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल स्वस्तात बाद झाले. त्यानंतर शिखर धवन आणि हार्दिक पांड्या यांनी १२९ धावांची भागीदारी केली. पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.