पहिल्या सामन्यात लाजिरवाणी हार आणि दुसऱ्या सामन्यात धमाकेदार विजय यानंतर तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने अतिशय झुंजार अशी खेळी केली. ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत भारताना तब्बल १३१ षटकं खेळून काढत केवळ पाच गड्यांच्या मोबदल्यात सामना वाचवला. ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर भारताकडून हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन या जोडीने शेवटपर्यंत खेळपट्टीवर तग धरला. या दोघांनी एकत्रित मिळून तब्बल ४३ षटकं खेळून काढली. यादरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन आणि रविचंद्रन अश्विन यांच्यात थोडी बाचाबाची झाली. त्यावेळी अश्विनने त्याला सडेतोड उत्तर देत गप्प केलं.

रविचंद्रन अश्विन आणि हनुमा विहारी दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अक्षरश: रडवलं. भारताच्या या दोन फलंदाजांना बाद करण्यासाठी कर्णधार पेनने खूप प्रयत्न केले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. अखेर अश्विनचं चित्त विचलीत करण्यासाठी त्याने स्टंपच्या मागून बडबड सुरू केली. “आम्ही आता चौथ्या कसोटीसाठी खूपच आतूर आहोत. तुझा हा शेवटचा दौरा असेल नाा”, असा खोचक सवाल टीम पेनने केला. त्यावर अश्विननेही भन्नाट उत्तर दिलं. “तू भारतात ये… मी पण तुला भारतात खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहे. ती तुझी शेवटची मालिका असेल”, असं उत्तर देत त्याने पेनची बोलती बंद केली.

आणखी वाचा- IND vs AUS: ‘टीम इंडिया’ सुसाट!! विहारी-अश्विनच्या खेळीमुळे १२ वर्षांनंतर केला ‘हा’ पराक्रम

Video: “हीच का तुमची खिलाडूवृत्ती?”; स्मिथने ड्रिंक्स ब्रेकमध्ये केलेल्या कृतीवर नेटीझन्स भडकले…

सामन्यात प्रथम ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करत ३३८ धावा केल्या. तर भारताचा पहिला डाव २४४ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात झटपट धावा करत भारताला विजयासाठी ४०७ धावांचे आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने अर्धशतक केलं. शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणेला फारशी चमक दाखवता आली नाही. पण पंतने धुवाधार ९७ धावा कुटल्या. पुजारानेही ७७ धावा केल्या. पण हे दोघे बाद झाल्यावर हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी कमाल केली. या दोघांनी सामना वाचवण्यासाठी तब्बल २५९ चेंडू म्हणजेच ४३ षटकं खेळून काढली आणि त्यात नाबाद ६२ धावांची भागीदारी केली.