फुटबॉलमधील सर्वोच्च प्रतिष्ठेचा बलॉन डीऑर पुरस्कार तब्बल सहा वेळा पटकावणाऱ्या लिओनेल मेसी याने आपण बार्सिलोनाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे जाहीर करत तमाम फुटबॉलप्रेमींना आश्चर्याचा धक्काच दिला. आता अर्जेटिनाच्या या नामांकित खेळाडूला करारबद्ध करण्यासाठी युरोपातील अव्वल क्लबमध्ये चुरस रंगली आहे.

मेसीचे बार्सिलोनामधील पर्व आता संपुष्टात येणार आहे. करारातील एका कलमाचा आधार घेत मेसीने अचानक करार रद्द करण्याचे ठरवले आहे. चॅम्पियन्स लीगमधील बायर्न म्युनिककडून पत्करलेल्या मानहानीकारक पराभवामुळे मेसीचे बार्सिलोनाशी संबंध ताणले गेले. त्यामुळेच मेसीने वकिलांमार्फत क्लबला सोडचिठ्ठी देणार असल्याचे कळवले आहे. आता मेसीला करारबद्ध करण्यासाठी युरोपियन क्लबमध्ये चुरस रंगली असून मँचेस्टर सिटी, पॅरिस सेंट-जर्मेन आणि इंटर मिलान या शर्यतीत आघाडीवर आहेत. मेसीने गेल्या आठवडय़ात मँचेस्टर सिटीचे प्रशिक्षक पेप गार्डिओला यांच्याशी चर्चा करून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

बार्सिलोना क्लबने अद्याप याविषयी अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी मेसीच्या सोडून जाण्याचे कलम १० जून २०२०मध्ये संपुष्टात आले आहे. मात्र त्याचा करार २०२१ मोसमापर्यंत असेल. वयाच्या १३व्या वर्षी मेसी बार्सिलोनाच्या युवा अकादमीमध्ये सामील झाल्यानंतर १७व्या वर्षी (२००४मध्ये ) त्याने पदार्पण केले.

कारकीर्द

*  १६ मोसमात १६ विजेतेपदे

*  चार वेळा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद

*  १० वेळा ला-लीगाचे जेतेपद

*  सहा वेळा बलॉन डीऑर पुरस्कार

*  एल क्लासिको लढतीत २६ गोल

कामगिरी

*  ला-लीगाच्या इतिसाहात सर्वाधिक ४४४ गोल

*  बार्सिलोनाकडून सर्व स्पर्धामध्ये ६३४ गोल

*  ला-लीगामध्ये सर्वाधिक

३६ वेळा हॅट्ट्रिक

*  सलग १० वेळा ४०पेक्षा अधिक गोल करणारा एकमेव

सुआरेझचीही बार्सिलोनाला सोडचिठ्ठी

मायामी : लिओनेल मेसीने आपण यापुढे बार्सिलोनासोबत खेळणार नसल्याचे मंगळवारी रात्री स्पष्ट केल्यानंतर आता त्याचा सहकारी लुइस सुआरेझ हासुद्धा बार्सिलोना क्लब सोडणार आहे. पुढील वर्षीच्या संघबांधणीच्या योजनेत सुआरेझचा समावेश नसल्याचे नवनियुक्त प्रशिक्षक रोनाल्ड कोमन यांनी स्पष्ट केल्यानंतर सुआरेझने आता इंटर मायामी या संघाशी बोलणी सुरू केली आहेत.