डॉ. प्रकाश परांजपे

वीज गेल्यामुळे आज डाव जमायला उशीर झाला होता. लिफ्ट बंद झाल्यामुळे कामं हळूहळू होत होती. फोनपण जपूनच वापरत होती मंडळी. चार्ज पुरायला पाहिजे ना.  ही संधी साधून पिंकीनं आबांना प्रश्न विचारला, ‘‘आबा, त्या डावात बदाम राजा आधी खेळायला पाहिजे, हे कसं ठरवलं तुम्ही?’’

‘‘सोपं आहे पिंकी,’’ आबा म्हणाले. ‘‘आमच्या दोन हातांमध्ये बदामची एकूण ५ + ४ अशी ९ पानं होती. याचाच अर्थ प-पू  जोडीकडे १३ मधून उरलेली चार. ती चार पानं जर २-२ किंवा ३-१ अशी विभागून वाटली गेली असतील तर एक्का-राजा-राणी वाजवल्यानंतर त्या तीन फेऱ्यांत पडून गेली असती. प्रश्न होता ४-० विभागणी कशी हाताळायची याचा. आता ती ४ पानं काय होती? पिंकीनं तेवढय़ात बोर्डमधून तो डाव काढून पटावर पानं पसरून ठेवली होती. गुलाम-दश्शी-अठ्ठी-पंजी अशी ती चार पानं होती. ती जर एक्का-राणीच्या डोक्यावर बसली असतील तर एक दस्त प-पू जोडीला द्यावा लागणारच होता, पण ती चार पानं जर एक्का-राणीच्या बगलेत असतील, तर मात्र एकही दस्त न हरता आपला ठेका बनवणं शक्य होतं. म्हणून मी राजा पहिल्यांदा खेळून बघितला. त्यावर जेव्हा माझ्या डाव्या हातातून बदामचं पान आलं नाही, तेव्हा पुढचा खेळ सरळ होता!’’ असं म्हणून आबांनी त्या डावाची पानं घेतली आणि जरा अदलाबदल करून पिंकीसमोर ठेवली.

‘‘समजा चार बदामच्या ठेक्यात इस्पिक राणीची उतारी आली आणि इस्पिकचे तीन दस्त वाजवून मेनननं चौथ्या दस्ताला एक किलवरचं पान लावलं, तर या (चित्रातल्या) डावात तू बदाम पंथाची पानं कशी खेळशील?’’  पिंकीने थोडा विचार केला आणि ती म्हणाली, ‘‘आबा, राजा पूर्वेला असल्याशिवाय गत्यंतर नाही, म्हणजे राजाला बगलेत घेतलंच पाहिजे. मी किलवर राजाने चौथा दस्त जिंकून बघ्याच्या हातातून बदाम गुलाम खेळेन.’’

‘‘पिंकी, अगदी बरोबर. गुलामावर भातखंडेला राजा खेळावाच लागेल. जेव्हा तू तो दस्त एक्का खेळून जिंकशील, तेव्हा हे स्पष्ट होईल की पश्चिमेकडे बदामचं पान नाही. पुढचा रस्ता सोपा आहे. किलवर राणीनं बघ्याच्या हातात पोहोचून एक छोटं बदाम खेळायचं आणि पूर्वेला पुन्हा कचाटय़ात पकडायचं आणि तो दस्त जिंकल्यानंतर चौकट राजाने पुन्हा एकदा ‘खाली’ जाऊन बदाम पान लावायचं म्हणजे पूर्वेच्या हातातली उरलेली पानंही बगलेत घेऊन आपले बदामचे पाच दस्त होतील. समेवर येताना कसलेले गवई कसे तिहाई घेऊन बरोबर पहिल्या मात्रेवर थडकतात, तसं या डावात आपण तीन वेळा बगलेतल्या पानांना पकडून आपला ठेका समेवर आणला, हो की नाही?’’

‘‘पण आबा, बदाम राजा जर पूर्वेकडे नसला, पश्चिमेकडे असला तर..?’’

‘‘राजा डाव्या हाताला असला तर ठेका बुडणार. त्याला आपला काही इलाज नाही. गीतेमध्ये काय सांगितलंय पिंकी? फळाची अपेक्षा ना धरता योग्य ते कर्म करत राहायचं. ब्रिज खेळताना तीच  भूमिका ठेवायची.’’

‘‘कर्मण्येवाधिकारस्ते!’’ पिंकी म्हणाली.

panja@demicoma.com

(आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)