दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान, ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमरुन बेनक्रॉफ्टकडून चेंडूशी छेडछाड करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथने याप्रकरणी कबुली दिल्यानंतर आता ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं कळतं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य अधिकारी जेम्स सदरलँड यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे दोन अधिकारी लियान रॉय आणि पॅट हॉवर्ड या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहेत.

अवश्य वाचा – चेंडूशी छेडछाड केल्याची बेनक्रॉफ्ट-स्मिथची कबुली

केप टाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कॅमरुन बेनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करत असल्याचं मैदानावरील पंचांच्या लक्षात आलं. टेलिव्हिजन कॅमेऱ्यामध्येही बेनक्रॉफ्ट चेंडूला एक पिवळसर वस्तु घासत असल्याचं स्पष्ट दिसतं होतं. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्टिव्ह स्मिथ आणि बेनक्रॉफ्ट या दोन्ही खेळाडूंनी याप्रकरणी कबुली दिल्यामुळे, ऑस्ट्रेलियन संघावर आता चारही बाजूंनी टीका करण्यात येत आहे. अनेक माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या वर्तनावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान या प्रकरणानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघ नेतृत्वात बदल करणार का? असा प्रश्न विचारला असता सदरलँड यांनी सावध भूमिका घेतली. “सध्याच्या परिस्थितीत स्टिव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार म्हणून काम पाहणार आहे. नेतृत्वात सध्यातरी कोणताही बदल करण्याचा आमचा विचार नाही. या प्रकरणातली चौकशी पूर्ण झाल्यानंतर सत्य समोर येईल. यावर चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आपली कारवाई करेल.” पत्रकारांशी बोलताना सदरलँड यांनी बोर्डाची भूमिका स्पष्ट केली.