उत्तर प्रदेशातील बनवारी टोला गावातील आपल्या वडिलांचं सलून चावणाऱ्या नेहा आणि ज्योती या बहिणींची कहाणी गेल्या काही दिवसांमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये आली होती. वडिल आजारी पडल्यानंतर आपल्या घराची आर्थिक जबाबदारी उचलण्यासाठी नेहा आणि ज्योती यांनी कोणतीही लाज न बाळगता सलून चालवणं पसंत केलं. अनेक दिवस लोकं, मुलींच्या हातून केस कसे कापून घ्यायचे या भावनेतून सलूनमध्ये फिरकलेच नाहीत. मात्र नेहा आणि ज्योती यांनी आपला विश्वास कायम राखत सलून चालू ठेवलं.

काही दिवसांनी नेहा आणि ज्योती यांच्या सलूनमध्ये ग्राहकांनी गर्दी करायला सुरुवात केली. या बहिणींच्या मेहनतीचं कौतुक करण्यासाठी जिलेट या कंपनीने त्यांची ही प्रेरणादायी कहाणी लोकांपुढे मांडली. त्यांची ही कहाणी यूट्यूबवर १.६० कोटी लोकांनी पाहिली. हे पाहिल्यानंतर क्रिकेटचा देव सचिननेही या मुलींकडून दाढी करुन घेण्याचं ठरवलं. सचिनने या आपल्या अनोख्या भेटीचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

याबाबत सचिन म्हणाला की, ” आतापर्यंत मी कधीही घराबाहेर दाढी केली नव्हती. आज हा विक्रम मोडीत निघाला. महिला सलूनमध्ये दाढी करणे हा एक सन्मान आहे.” सचिनने उचललेल्या या पावलाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.