चेस्टर ली स्ट्रीट : इंग्लंडविरुद्ध धक्कादायक विजय मिळवून श्रीलंकेने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान टिकवले आहे. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना हा श्रीलंकेसाठी अस्तित्वाचा लढाच असणार आहे.

श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध २० धावांनी आश्चर्यकारक विजय मिळवल्यामुळे उपांत्य फेरीसाठीची स्पर्धा अत्यंत तीव्र झाली आहे. कामगिरीत सातत्याचा अभाव असलेला श्रीलंकेचा संघ दोन विजयांनिशी सहा गुण मिळवून गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे उर्वरित तीन सामने जिंकले, तरच त्यांना उपांत्य फेरी गाठता येऊ शकेल. १९९६च्या विश्वविजेत्या श्रीलंकेला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात परिधान केलेल्या दुसऱ्या पसंतीच्या ‘यशस्वी पिवळ्या जर्सी’चा फायदा झाला होता. धनंजय डी’सिल्व्हा आणि लसिथ मलिंगा यांच्या गोलंदाजीमुळे २३३ धावा उभारल्यानंतर इंग्लंडला २१२ धावांत रोखता आले.

२०१५च्या विश्वचषकामधील उपांत्य सामन्यात पाकिस्तानकडून ४९ धावांनी पराभूत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या वाटचालीपुढे पूर्णविराम मिळाले होते. दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आधीच संपुष्टात आल्यामुळे त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही. परंतु प्रतिष्ठा राखणारा विजय मिळवण्यासाठी ते आशावादी आहेत.

आफ्रिकेच्या संघात मतभेद

पाकिस्तानकडून पत्करलेल्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघावर तीव्र टीका होत आहे. याच सामन्यानंतर कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस आणि महत्त्वाचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा यांच्यातील मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत. संघातील नकारात्मकतेमुळे कामगिरीवर परिणाम होत असल्याचे अधोरेखित होत आहे.

शम्सी आणि प्रीटोरियसला संधी मिळणार

दक्षिण आफ्रिका संघात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याच्या दृष्टीने बदल केले जाण्याची चिन्हे आहेत. ताबारेझ शम्सी आणि ड्वेन प्रिटोरियस यांना या सामन्यात संधी मिळू शकेल. त्यामुळे कोणत्या खेळाडूंना विश्रांती मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल

करुणारत्ने, परेरावर फलंदाजीची मदार

इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला असला तरी श्रीलंकेच्या फलंदाजीत सुधारणा होण्याची नितांत आवश्यकता आहे. दिमूथ करुणारत्ने (एकूण १८० धावा) आणि कुशल परेरा (एकूण १६१ धावा) यांच्यावर श्रीलंकेची प्रमुख मदार आहे.

मलिंगाचे आव्हान

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या विजेतेपदाचा शिल्पकार ठरलेल्या लसिथ मलिंगाने इंग्लंडविरुद्धच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. त्याच्या खात्यावर आता २६.६२च्या सरासरीने एकूण आठ बळी जमा आहेत. वादळी गोलंदाजीमुळे ३५ वर्षीय मलिंगाचे आव्हान पेलणे दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

सामना क्र. ३५

श्रीलंका वि. दक्षिण आफ्रिका

’स्थळ : रिव्हरसाइड ग्राऊंड, चेस्टर ली स्ट्रीट  ’सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.

’थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १

संघ

श्रीलंका : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार) लसिथ मलिंगा, अविष्का फर्नाडो, लाहिरु थिरिमाने, कुसल परेरा, कुसल मेंडिस, अ‍ॅँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी’ सिल्व्हा, जेफ्री वॅँडरसे, थिसारा परेरा, इसुरू उडाना, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, जीवन मेंडिस, मिलिंदा सिरिवर्दना.

दक्षिण आफ्रिका : फॅफ डय़ू  प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, क्विंटन डी’कॉक (यष्टीरक्षक), जेपी डय़ुमिनी, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, लुंगी एन्गिडी, ब्युरन हेंड्रिक्स, कॅगिसो रबाडा, इम्रान ताहिर, ताबारेझ शम्सी, अँडीले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, व्हॅन डर डुसेन.

आमनेसामने

एकदिवसीय    

सामने : ७६,  द. आफ्रिका : ४३,

श्रीलंका : ३१, टाय / रद्द : १/१

विश्वचषकात   

सामने : ५, द. आफ्रिका: ३,

श्रीलंका: १, टाय / रद्द : १/०