पाकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस चषक लढतीत भारताकडे २-० अशी आघाडी

नूर-सुलतान : पाकिस्तानच्या नवख्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध रामकुमार रामनाथन आणि सुमित नागल यांनी सहज विजय मिळवत शुक्रवारी भारताने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या पहिल्या दिवशी २-० अशी शानदार आघाडी घेतली आहे. भारताने फक्त दोन गेम गमावले.

पहिल्या लढतीत रामकुमारने ४२ मिनिटांत १७ वर्षीय मुहम्मद शोएबचा ६-०, ६-० असा पराभव केला. शोएबकडून फक्त दुसऱ्या सेटमधील सहाव्या गेममध्ये प्रतिकार झाला. त्यानंतर सुमितने डेव्हिस चषकातील पहिल्यावहिल्या विजयाची नोंद करताना दुसऱ्या एकेरीच्या लढतीत ६४ मिनिटांत हुझैफा मोहम्मद रेहमानचा ६-०, ६-२ असा पराभव केला.

इस्लामाबादला होणारा सामना त्रयस्थ ठिकाणी हलवल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या मातब्बर खेळाडूंनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने भारतासाठी ही लढत अत्यंत सोपी झाली. पहिल्या सामन्यात रामकुमारला आव्हानच नव्हते, पण दुसऱ्या सामन्यात हुझैफाने दीर्घ रॅलीज खेळत उत्तम टक्कर दिली.

आता शनिवारी अनुभवी लिएण्डर पेस पदार्पणवीर जीवन नेदुनशेझियानच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करू शकेल. पेस-जीवन दुहेरीत हुफैझा आणि शोएब यांचा सामना करतील. पेसच्या खात्यावर आता ४३ दुहेरीतील विजयांची नोंद आहे. शनिवारी आपल्या विक्रमी विजयांत तो आणखी भर घालू शकेल. भारताने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत याआधी सहा वेळा पाकिस्तानचा सामना केला आहे. परंतु यापैकी एकही सामना गमावलेला नाही. भारत-पाकिस्तान लढतीमधील विजेता संघ ६ आणि ७ मार्च २००० या दिवशी क्रोएशियाविरुद्ध जागतिक गटाची पात्रता लढत खेळणार आहे.

प्रत्येक गुण मिळवण्यासाठी मी सर्वोत्तम खेळ केला. पहिल्या दिवसअखेर भारताकडे असलेली २-० अशी आघाडी समाधान देणारी आहे. आता शनिवारी जीवन आणि लिएण्डर यांच्याकडून आक्रमक खेळाची अपेक्षा आहे.   -रामकुमार रामनाथन

दुसरा दिवस

लिएण्डर पेस आणि जीवन नेदुनशेझियान वि. मुहम्मद शोएब आणि हुझैफा अब्दुल रेहमान

सुमित नागल विजयी वि. मुहम्मद शोएब

रामकुमार रामनाथन वि. हुझैफा अब्दुल रेहमान

सामन्याची वेळ : सकाळी ११.३० वा.

पहिला दिवस

भारत २, पाकिस्तान ०

रामकुमार रामनाथन विजयी वि. मुहम्मद शोएब  ६-०, ६-०

सुमित नागल विजयी वि. हुझैफा अब्दुल रेहमान  ६-०, ६-२