तिरंदाजी विश्वचषकामध्ये २० वर्षीय दीपिका कुमारीने सुवर्णपदक पटकावले आणि त्यानंतर तिची पहिली प्रतिक्रिया होती ती म्हणजे, जुनं ते सोनं. काही वर्षांपूर्वी दीपिका जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी होती, पण त्यानंतर तिची एवढी घसरण झाली की ती थेट अव्वल दहा खेळाडूंच्या बाहेर फेकली गेली. यावेळी तिने बरेच प्रशिक्षकही बदलले, पण काहीही फरक पडत नव्हता. त्यानंतर तिने आपले जुने प्रशिक्षक धरमेंदर तिवारी यांची भेट घेतली, त्यांच्या मार्गदर्शनानुसार तिने जुना धनुष्यबाणही वापरला आणि विश्वचषकात तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. या सुवर्णाबरोबरच तिने मिश्र रीकव्‍‌र्ह प्रकारात जयंत तालुकदारबरोबर खेळताना कांस्यपदकाची कमाई केली.
‘‘२०१२ साली जागतिक क्रमवारीत मी अव्वल स्थानावर होती. पण त्यानंतर कामगिरीमध्ये सातत्य न राखल्याने मला अव्वल स्थान तर गमवावेच लागले, पण अव्वल दहा खेळाडूंमधूनही मी बाहेर फेकली गेली. यावेळी मी काही प्रशिक्षक बदलले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर मी पुन्हा जुने प्रशिक्षक धरमेंदर यांच्याकडे आले. त्यांना माझ्या खेळातले बारकावे माहिती होते. त्यानुसार त्यांनी मला मार्गदर्शन केले. मी नवीन धनुष्यबाणाऐवजी जुनाच वापरला आणि मला यश मिळाले,’’ असे दीपिकाने सांगितले.