प्रशांत केणी
करोनाची लागण झाल्यानंतरचा कालखंड माझ्यासाठी आणि संघासाठी आव्हानात्मक होता. त्यातून सावरल्यानंतर तीन सामन्यांत अपयशी ठरलो. परंतु कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा कानमंत्र माझ्यासाठी उपयुक्त ठरल्यामुळे यश मिळवू शकलो, अशी प्रतिक्रिया चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने व्यक्त केली.
यंदाच्या ‘आयपीएल’मधील पहिल्या तीन सामन्यांत ऋतुराज (राजस्थान, दिल्ली आणि मुंबई यांच्याविरुद्ध अनुक्रमे ०, ५, ० धावा) अपयशी ठरला. पण त्यानंतर सलग तीन सामन्यांत बेंगळूरु, कोलकाता आणि पंजाबविरुद्ध अनुक्रमे ६५*, ७२ आणि ६२* धावा करीत त्याने सामनावीर पुरस्कारही पटकावले.
या यशाचे श्रेय धोनीला देताना ऋतुराज म्हणाला, ‘‘यंदाच्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात मुंबईविरुद्ध मी शून्यावर बाद झाल्यावर धोनीने माझ्याशी संवाद साधला. तू करोनातून सावरून मैदानावर परतला आहेस, याची आम्हाला जाणीव आहे. पुढील तिन्ही सामन्यांत तू खेळणारच आहेस. कोणतेही दडपण न बाळगता क्रिकेटचा सर्वोच्च आनंद लूट. यातून तू पूर्णत: सावरशील, तेव्हा मैदानावर वेगळाच ऋतुराज असेल, हे त्यांचे बोल माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले.’’
‘आयपीएल’च्या हंगामाला प्रारंभ होण्याआधीच ऋतुराजसह १४ जणांना करोनाची बाधा झाली. त्यानंतरच्या दिवसांबाबत ऋतुराज म्हणाला, ‘‘स्वतंत्र हॉटेलमध्ये निवास, संघासोबत सरावास स्थगिती, बॅटसुद्धा हातात न पकडणे, हे विलगीकरणातील महत्त्वाचे घटक आव्हानात्मक होते. पण ते संपल्यानंतर दोनच दिवसांनी मी पहिला सामना खेळलो. त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यांत मैदानावर सरावणे कठीण जाईल, याची कल्पना होती. पण माझा आत्मविश्वास ढळू दिला नाही. दिलीप वेंगसरकर अकादमी, भारत ‘अ’ संघ आणि चेन्नई संघाचे शिबीर हा सराव फायदेशीर ठरला.’’
‘आयपीएल’मधील तीन खेळींनी आयुष्याला कलाटणी मिळाली आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना ऋतुराज आनंदाने म्हणाला, ‘‘होय, नक्कीच. माझ्या दृष्टिकोनातही बदल झाला आहे. अखेरच्या तीन सामन्यांत आम्ही जिंकलो, याचा आनंद सर्वाधिक आहे. करोनातून सावरून एका युवा खेळाडूने इतकी उत्तम कामगिरी साकारल्याने सर्वाकडूनच कौतुक झाले.’’
सचिनकडून कौतुक अभिमानास्पद!
सचिन तेंडुलकर यांच्याकडून झालेले कौतुक माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, असे ऋतुराजने सांगितले. ‘‘सचिनने माझ्या ‘आयपीएल’मधील खेळींचे कौतुक करणे, हा माझ्यासाठी अनपेक्षित धक्का होता. त्यांच्या माझ्याविषयीच्या प्रतिक्रियेची ध्वनीचित्रफित मी पुन्हा पुन: ऐकतो,’’ असे ऋतुराजने सांगितले.