विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचे आव्हान संपुष्टात आल्यापासून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. धोनीचे चाहते धोनीमध्ये अजूनही क्रिकेट शिल्लक आहे. त्याने इतक्यात निवृत्त होऊ नये, अशी मतं व्यक्त करत आहेत. पण धोनी मात्र विश्वचषकानंतर अद्याप क्रिकेटच्या मैदानावर उतरलेला नाही. धोनीने विश्वचषक स्पर्धेनंतर दोन महिन्यांची विश्रांती घेतली होती. या कालावधीत त्याने काश्मीरमध्ये जाऊन भारतीय लष्कराला सेवा दिली. त्यानंतर धोनी मैदानात परतेल असे वाटत असतानाच तो नोव्हेंबरपर्यंत विश्रांती घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे धोनी मैदानावर परतण्याऐवजी निवृत्ती जाहीर करणार अशी चर्चा पुन्हा रंगू लागली. त्यातच ट्विटरवर Dhoni Retires असा एक हॅशटॅग ट्रेंड झाल्यामुळे निवृत्तीची पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

धोनी पुन्हा संघात परतणार? BCCI अध्यक्ष गांगुलीने दिले संकेत

ट्विटरवर Dhoni Retires असा हॅशटॅग ट्रेंड झाला. हा हॅशटॅग ट्रेंड झाल्यानंतर त्या हॅशटॅग खाली मोठ्या प्रमाणात ट्विटचा पाऊस पडला. धोनीतील क्रिकेट हे अद्याप संपलेले नाही. धोनीला त्याची कारकिर्द कधी संपवायची हे चांगलंच माहिती आहे. सगळ्यांनी कृपया Dhoni Retires हा हॅशटॅग वापरणं बंद करा अशा आशयाचे ट्विट्स मोठ्या प्रमाणावर दिसून आले. तर धोनीचे काही चाहते भाऊक झाल्याचेही दिसून आले. काही चाहत्यांनी तर या हॅशटॅगचे मीम्सदेखील बनवले.

दरम्यान, BCCI अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गांगुलीने एका पत्रकार परिषदेत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले. “धोनीने आपल्या कामगिरीमुळे भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. जेव्हा तुम्ही शांतपणे बसाल आणि धोनीने केलेल्या विक्रमांची यादी पहाल, तेव्हा तुम्हीच म्हणाल की चॅम्पियन इतक्या लवकर संपत नाहीत. जोवर मी BCCI चा अध्यक्ष आहे, तोपर्यंत साऱ्यांचा योग्य मान राखला जाईल”, असे गांगुलीने स्पष्ट केले.