भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) त्रिसदस्यीय समितीने भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी आणि माजी महान कसोटीपटू पंकज रॉय यांना सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला आहे.

डायना यांनी महिला क्रिकेटसाठी अत्यंत मोलाचे योगदान देताना २० कसोटी सामने आणि ३४ एकदिवसीय सामने खेळले. त्यांच्या १७ वर्षांच्या कारकीर्दीत या दोन्ही प्रकारात त्यांनी अनुक्रमे ६३ आणि ४६ बळी मिळवले. डायना खेळत असतानाच्या काळात त्यांचे सामने हे भारतीय महिला क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून खेळवले जात होते. त्यांचे भारतीय महिला क्रिकेटच्या प्रसारातील योगदान खूप मोठे आहे. मात्र, त्यांना हा पुरस्कार जाहीर होण्याच्या या वेळेबाबत क्रिकेटच्या वर्तुळात शंका उपस्थित केल्या जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या प्रशासक समितीवर डायना यांची नियुक्ती केलेली असल्याने त्यांना हा पुरस्कार जाहीर होत असल्याबाबत मतभेद व्यक्त होत आहेत. ज्येष्ठ पत्रकार एन. राम, विद्यमान अध्यक्ष सी. के. खन्ना आणि सचिव अमिताभ चौधरी यांचा समावेश असलेल्या समितीने डायना यांच्या नावाची शिफारस केली आहे.

पदाधिकाऱ्यांमध्ये मतभिन्नता

प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांना या प्रस्तावाबाबत विचारणा केली असता मला त्या प्रस्तावांबाबत माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, हितसंबंधाबाबत तुम्ही माझे मत विचारत असाल तर मी माझा विचार मांडू शकतो. जेव्हा एखादी समिती बाहेरील कोणत्याही प्रभावाखाली न येता एखादा निर्णय घेत असेल तर माझ्या मते तो लाभाच्या पदाचा मुद्दा होत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

गतवर्षी जीवनगौरव पुरस्कार निवड समितीत एन. राम आणि रामचंद्र गुहा यांच्यासमवेत डायना एडलजी यांचा समावेश होता. त्या पाश्र्वभूमीवर क्रिकेट मंडळाच्या एका मान्यवराने हा थेट हितसंबंधांचा मुद्दा नसल्याचे म्हटले आहे.

गायकवाड, सुधा शाह यांचाही गौरव

डायना एडलजी आणि पंकज रॉय यांना २०१६ -१७ या वर्षांसाठी तर भ्माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड आणि महिला संघाच्या माजी कर्णधार सुधा शाह यांना २०१७ -१८ या वर्षांसाठी हा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याशिवाय अब्बास अली बेग, दिवंगत कसोटीपटू नरेन ताम्हणे, आणि दिवंगत कसोटीपटू बुधी कुंदरन यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. जूनमध्ये भारत -अफगाणिस्तानदरम्यान होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याप्रसंगी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.