लॉकडाउन काळात भारत आणि पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंनी मैदानावरील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. हरभजन सिंग शी भांडण झाल्यावर त्याच्या खोलीत त्याला मारायला गेलो होतो असा किस्सा काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या शोएब अख्तरने सांगितला होता. तशाच एका मैदानावरील वाद आणि स्लेजिंगच्या प्रकाराबद्दल पाकिस्तानच्या माजी खेळाडूने स्पष्टीकरण दिले. पाकिस्तानचा माजी फलंदाज आमिर सोहेल पाकिस्तानचा कर्णधार असताना भारताचा माजी सलामीवीर नवज्योत सिंग सिद्धू याने भर मैदानातच त्याला बॅटने फटकवण्याची धमकी दिली असल्याचे वृत्त काही काळ क्रिकेटवर्तुळात चर्चेत होते. याबाबत आमिर सोहेलने नुकतेच एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिले.

“मला मैदानात सामना सुरू असताना सिद्धूने बॅटने मारण्याची धमकी दिली हे वृत्त निव्वळ खोटं आहे. मैदानात असं काहीही घडलं नव्हतं. त्यावेळी काही वेगळंच प्रकरण झालं होतं. सिद्धू फलंदाजी करत असताना अचनाक षटकाच्या मध्येच मला सिद्धूने बोलावून सांगितलं की तू तुझ्या वेगवान गोलंदाजाला (वकार युनिस) समजावून सांग. तो सारखी बडबड करतोय. मी विचारलं की नक्की काय झालं? त्यावर सिद्धू म्हणाला की तुझा गोलंदाज बडबड करून मला त्रास देतोय. त्यावर मी सांगितलं की तो वेगवान गोलंदाज आहे त्यामुळे त्याला गोलंदाजी करताना बडबड करण्याची सवय आहे. त्यावर सिद्धूने मला सांगितलं की त्याने बडबड केली तरी चालेल पण तो मला शिव्या देतोय आणि आक्षेपार्ह शब्द उच्चारतोय. ते त्याला बंद करायला सांग. ते ऐकून मी त्यांना सांगितलं की मी त्याला सामना संपला की समजावतो. तुम्ही आता त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि खेळावर लक्ष द्या”, असा किस्सा आमिर सोहेलना सांगितला.

दरम्यान, ही घटना १९९६ मध्ये शारजाच्या मैदानावर घडली होती. त्या सामन्यात सिद्धूने १०१ धावा केल्या होत्या. त्याच्या आणि सचिन तेंडुलकरच्या भागीदारीमुळेच भारताला पाकिस्तानवर विजय मिळवता आला होता.